पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २७व्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली. सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले रवि लांडगे महापौरपदीही बिनविरोध निवडून येत त्यांनी एक नवी परंपरा कायम ठेवली आहे.
१५ ऑगस्ट १९८४ रोजी भोसरी येथे जन्मलेले ४१ वर्षीय रवि लांडगे हे डी. फार्मसी पदवीधारक असून शेती, वाचन आणि खेळाची त्यांना विशेष आवड आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहे. त्यांचे वडील कै. बाबासाहेब लांडगे हे जनसंघाच्या काळापासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी १९९२ मध्ये नगरसेवक व विरोधी पक्षनेतेपद भूषवले. चुलते कै. अंकुशराव लांडगे हे देखील १९९७ मध्ये नगरसेवक, विरोधी पक्षनेते आणि भाजपचे शहराध्यक्ष होते.
२००७ मध्ये चुलत्यांच्या निधनानंतर अवघ्या २२ व्या वर्षी रवि लांडगे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. २०१५ मध्ये त्यांनी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ धावडेवस्ती–भगतवस्तीमधून ते पहिल्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मागील पंचवार्षिकमध्ये स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्याने ते नाराज झाले होते. याच काळात भोसरी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. मात्र, ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सुटल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून रवि लांडगे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पुन्हा प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडून आले. सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला.
सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून पहिल्या अडीच वर्षांसाठी रवि लांडगे यांना महापौरपदाची संधी देत मागील पंचवार्षिकमधील अन्याय दूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापौरपदीही त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे या माजी नगरसेविका आहेत.
सामाजिक कार्यात ठसा
भोसरी परिसरात रवि लांडगे यांचे सामाजिक कार्य लक्षणीय आहे. भोसरीतील २०० खाटांच्या रुग्णालयाचे खासगीकरण रोखण्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारून यश मिळवले. ते आनंद ग्रुप पुणेचे संस्थापक अध्यक्ष, कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान आणि शिव गणेश मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या २५ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
तसेच नियुद्ध कराटे व मार्शल युद्ध संघाचे अध्यक्ष म्हणून कराटे स्पर्धा, दिवाळी पहाट, होम मिनिस्टर कार्यक्रम आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन ते करतात. दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि भव्य रोजगार मेळावे आयोजित केले जातात. प्रतिष्ठानामार्फत महिलांसाठी शिवणकला, तांत्रिक उद्योजकता व पाककला प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्यही ते सातत्याने करत आहेत.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…