पुणे: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन विकासकामांना गती देण्यात आली. त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी २०२७ रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन लोकनेते अजितदादा पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करावे. तसेच बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण ‘जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे. यासंदर्भातील तीन महत्त्वपूर्ण ठराव पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात महिला प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा (ग्रामीण) महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तीन महत्त्वपूर्ण ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
पहिल्या ठरावानुसार, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी असलेल्या सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी २०२७ रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी आणि त्यासाठी भरीव विकासनिधी उपलब्ध करून देत परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. तसेच बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
दुसऱ्या ठरावात लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ हा शब्द न लावता भाषणे, बॅनर आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ ‘लोकनेते अजितदादा पवार’ असाच उल्लेख करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.
तिसऱ्या ठरावानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, सहकारी साखर कारखाने, बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ तसेच अन्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व महिला प्रतिनिधींना पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अनिवार्यपणे आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, सिंदखेडराजा येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यासह बुलढाणा जिल्ह्याचे ‘जिजाऊनगर’ असे नामकरण करण्याच्या मागणीचा ठराव महिला प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार आहे.
या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांनी लोकनेते अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पाहिलेल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला. ‘अजितदादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, एकजुटीने काम करूया!’ अशा घोषणांनी बैठकीत निर्धार व्यक्त करण्यात आला.
‘जिजाऊनगर’ नामकरणाची मागणी आणि सिंदखेडराजातील विशेष मंत्रिमंडळ बैठकीचा ठराव यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आता विदर्भातील विकासाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.
शरीरात पुढे सांगितलेली काही लक्षणं दिसत असतील तर व्हिटॅमिन बी १२ लवकरात लवकर तपासून घ्या.…
हात-पायांना वारंवार सूज येत असेल तर ती केवळ थकवा किंवा जास्त वेळ उभे राहिल्यामुळेच येते…
वजन कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कॅलरी कमी करणाऱ्या डाएटचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे.…
वेव्हज् फिल्म बझारमध्ये प्रथमच स्वतंत्र दालन; कोल्हापूर चित्रनगरीलाही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी गोवा: गोव्यात सुरू असलेल्या…
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्देशानंतर यंत्रणा सक्रिय शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था,…
मांडवगण फराटा (संपत कारकुड) : शिरूर तालुक्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' निवडीत शैक्षणिक अर्हता जाहीरनाम्यातील…