महाराष्ट्र

पंढरपूरच्या भूमीतून शिंदेंचा विकास मंत्र; भालके यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट

पंढरपूर: “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या पावन भूमीतून जनतेशी थेट संवाद साधत विकास, हिंदुत्व आणि जनसेवेचा ठाम संदेश दिला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात झालेल्या या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली, तर शिंदे यांच्या आक्रमक आणि भावनिक भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली.

पौराणिक संदर्भ देत शिंदे म्हणाले की, जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके पंढरपूरात विकासाची गंगा आणतील. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भालके यांच्या खांद्यावरचा भगवा हा फक्त पक्षाचा नसून तो भागवत धर्माचा, प्रभू रामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाचा ठसा उमटवला.

भगीरथ भालके यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भालके यांच्या प्रवेशामागील प्रसंग सांगताना शिंदे म्हणाले की, “ते मला म्हणाले माझं काय चुकलं? त्यावर मी सांगितलं तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी… आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला.” याच वेळी “मूळ शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध झालं आहे,” असे ठाम विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

स्वतःला “महाराष्ट्राच्या विकासाचा वारकरी” संबोधत त्यांनी संत तुकारामांचा अभंग सादर केला “आला वारीचा दिवस, झाला आनंदे उत्सव… जुळती भक्तांची रांग, पुढे विठोबाचा संग… तुका म्हणे धावा रे…” तसेच “हम तो चले थे मंजिल मगर… लोग मिलते गए, कारवाँ बढ़ता गया…” या ओळींनी शिवसेनेचा वाढता प्रभाव अधोरेखित केला.

मीडिया आणि विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, “ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. काही चॅनलवालेच डरकाळी फोडत आहेत. ती ऐकून काही जण म्याव-म्याव करत आहेत.” बाळासाहेबांच्या विचारांमुळे आणि भगव्याच्या शानमुळेच लोक शिवसेनेसोबत येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “फिनिक्स पक्षी राखेतून भरारी घेतो, तसेच भगीरथ भालके हे शिवसेनेचे फिनिक्स आहेत,” असे सांगत त्यांनी भालके यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

दिवंगत भारत भालके यांच्या कार्याचा उल्लेख करत “जनसेवा हीच विठ्ठलसेवा” हा त्यांचा संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. “गोड बोलायचं आणि काम टाळायचं अशी काहींची वृत्ती आहे; पण भालके तसे नाहीत. जनतेचे समाधान भालकेच करू शकतात,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

शेतकरी आणि ग्रामीण विकासावर बोलताना “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या कामाचे कौतुक केले.

अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांचा उल्लेख करत “काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे; पण हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मंदिर विकास, जलसंधारण, सिंचन आणि क्रीडा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवेढा येथील संत चोखामेळा आणि महात्मा बसवेश्वर स्मारकांच्या मागण्याही मान्य करण्याचा शब्द त्यांनी दिला.

“२०२२ मध्ये आपण धाडसी निर्णय घेत शिवसेना वाचवली. सामान्य जनतेने साथ दिली,” असे सांगत त्यांनी जनतेचे आभार मानले. “बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है… शिवसेना को हराना नामुमकिन है,” असा घणाघात करत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “फेसबुक लाईव्ह करणारे, नेटफ्लिक्स पाहणारे आणि निवडणुकीतच राजकारण करणारे आम्ही नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

कार्यकर्त्यांना संदेश देताना त्यांनी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे मिशन पुन्हा अधोरेखित केले. “प्रत्येक कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे व्हा,” असे आवाहन करत त्यांनी पक्षवाढीवर भर दिला. “२०% राजकारण आणि ८०% समाजकारण” हा मंत्र देत जनतेचा विश्वास विकासात रूपांतरित करण्याचे त्यांनी आवाहन केले.

मुख्यमंत्री असताना साडेचारशे कोटी रुपये रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी दिले. आधीच्या सरकारने फक्त तीन कोटी रुपये खर्च केल्याची आठवण त्यांनी करून दिली. पंढरपूरला जागतिक तीर्थक्षेत्र बनवणार आहे. कॉरिडोरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन केले जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

अजित दादा पवार म्हणाले होते सर्वाधिक सह्या करणार मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहे. प्रॉपर्टी कमावण्यापेक्षा मी माणसे कमली असेही ते म्हणाले. कार्यकर्ता हा आपल्यासाठी अविरतपणे काम करत असतो. त्याच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे,असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, खासदार, आमदार, मंत्री यांना केले.

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, रोजगार हमी मंत्री भारतशेठ गोगावले, आमदार तानाजी सावंत,आमदार राजू खरे,खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योती वाघमारे, माजी आमदार शाहजीबापू पाटील, संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख चरणदास चवरे, अमोल शिंदे, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

1 दिवस ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago