माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर
बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अनेक शेतकरी सभासदांच्या संसाराचा गाडा अवलंबून आहे. त्यामुळे कारखान्याचा प्रत्येक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात चांगला ऊस पिकावा आणि प्रत्येक सभासदाच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, हीच गळीत हंगामाच्या शुभारंभानिमित्त प्रार्थना असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा अजितदादा पवार यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभासदांशी संवाद साधताना त्यांनी कारखान्याचे आर्थिक हित, शेतकऱ्यांचे स्थैर्य, कामगारांचे योगदान आणि आगामी काळातील पाणी व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर भूमिका स्पष्ट केली.
अजितदादांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार
स्वर्गीय अजितदादांचे माळेगाव साखर कारखान्यासाठीचे योगदान आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनानंतर १२ मार्च रोजी आपल्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी आली. अजितदादांनी सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने कारखान्याची वाटचाल सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
सभासदांचे हित हेच कारखान्याचे हित असून, कारखान्याच्या प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे. स्वर्गीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावरूनच कारखान्याची वाटचाल सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऊसदरासोबत आर्थिक शिस्तीवर भर
यंदा कारखान्याने सर्वाधिक ऊसदर दिल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी आर्थिक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कारखान्याचा विकास करताना आर्थिक नियोजन, सभासदांचे हित आणि भविष्यातील गरजा यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कारखान्याच्या माध्यमातून लवकरच सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर कारखान्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांच्या योगदानाचा योग्य सन्मान झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादनाचे नियोजन
यंदा कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख करत सुनेत्रा पवार यांनी पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या दौऱ्यात पाण्याची गंभीर समस्या प्रकर्षाने जाणवल्याचे नमूद करत आगामी काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजनांवर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कामगारांच्या कष्टांचा योग्य सन्मान व्हावा
साखर कारखान्याच्या यशामागे शेतकऱ्यांइतकेच कष्टकरी कामगारांचे योगदानही महत्त्वाचे असते. कारखान्याची यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी कामगार अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या या योगदानाबद्दल सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे हित, कामगारांचा सन्मान, आर्थिक शिस्त आणि भविष्यातील विकास यांचा समन्वय साधत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रगती सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वर्गीय अजितदादांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा वारसा जपत सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…
रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…