महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी

इफ्फीतील परिसंवादात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण घोषणा; सात दिवसांत चित्रीकरण परवानग्यांची सुविधा

गोवा: महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह कमी बजेटच्या चित्रपटांना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच नवी यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) परिसंवादात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

गोवा येथे सुरू असलेल्या इफ्फीअंतर्गत वेव्हज् फिल्म बझारच्या मंचावर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि चित्रपट परिसंस्थेतील संधी, विकासाच्या शक्यता आणि भविष्यातील दिशा’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन, सिनेमॅटोग्राफर व दिग्दर्शक महेश लिमये आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुहृद गोडबोले सहभागी झाले होते. चित्रपट अभ्यासक-दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांनी सूत्रसंचालन केले.

आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीसाठी स्वतंत्र व्यवस्था

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते आणि संस्थांना आकर्षित करण्यासाठी सहनिर्मितीची स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची आवश्यकता दिग्दर्शक निखिल महाजन यांनी मांडली. यावर सकारात्मक भूमिका घेत डॉ. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अशी व्यवस्था सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीच्या माध्यमातून मराठी आणि भारतीय चित्रपटांना जागतिक बाजारपेठेत पोहोचण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असेही या चर्चेत अधोरेखित झाले.

चित्रीकरण परवानग्यांसाठी सात दिवसांची कालमर्यादा

महाराष्ट्रात चित्रपट चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खिडकी प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून निर्मात्यांना विविध विभागांच्या परवानग्या सात दिवसांच्या कालमर्यादेत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील बाह्य चित्रीकरण स्थळांसाठी आतापर्यंत सुमारे पाच हजार परवानग्या देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निर्मात्यांचा वेळ वाचण्यासह महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांचा वापर अधिक सुलभ होत असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

छोट्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा प्रश्न मार्गी लागणार?

कमी बजेटच्या चित्रपटांची निर्मिती करणे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच त्यांना चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी संधी मिळवून देणेही कठीण बनले आहे. मल्टिप्लेक्समधील वाढते तिकीटदर, मर्यादित शो आणि योग्य वेळेत प्रदर्शनाची संधी न मिळणे यामुळे लहान निर्माते आणि नवोदित दिग्दर्शकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा निखिल महाजन यांनी मांडला.

या समस्यांची शासनाने दखल घेतली असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. कमी बजेटच्या चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच सक्षम यंत्रणा विकसित करण्यात येईल. चित्रपटगृहांमधील शोचे नियोजन आणि प्रदर्शनाच्या संधी यांसह विविध प्रश्नांवर संबंधित विभागांशी समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

चित्रपट निर्मितीबरोबरच स्थळांची जबाबदारीही महत्त्वाची

महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी चित्रपट परिसंस्थेचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. बदलत्या काळातील निर्माते आणि प्रेक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा व यंत्रणा विकसित करण्यावर महामंडळाचा भर आहे. चित्रपट क्षेत्रातील अनुभवी दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात असून, त्यानुसार उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांची क्षमता अधोरेखित करताना दिग्दर्शक महेश लिमये यांनी राज्यात अनेक उत्तम लोकेशन्स आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, चित्रीकरणानंतर संबंधित स्थळांची स्वच्छता आणि मूळ स्थिती कायम राखणे ही निर्मात्यांची जबाबदारी आहे. एखाद्या निर्मिती संस्थेच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात इतर निर्मात्यांनाही त्या ठिकाणी चित्रीकरणाची परवानगी नाकारली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने चित्रीकरण स्थळांची योग्य देखभाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विधानपरिषदेतील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आता पुस्तकबद्ध

राज्यपालांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन मुंबई: विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, शासनाची उत्तरे आणि…

16 मिनिटे ago

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल; एकनाथ शिंदे

मुंबई: विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडणाऱ्या…

21 मिनिटे ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

4 तास ago

दुधात मध घालून प्यायल्याने हाडे व सांधे मजबूत होऊन गाढ झोप लागते

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे.…

4 तास ago

हृदयविकार लक्षणे आणि उपाय

मानवाचे हृदय एक पोकळ मांसपेशीनी बनलेला शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याचा आकार बंद मूठी एवढा…

4 तास ago

चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या चित्रीकरण सुविधांचे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन

गोवा : महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पायाभूत सुविधा, चित्रीकरणासाठी उपलब्ध स्थळे, विविध योजना आणि विकासात्मक उपक्रमांची…

4 तास ago