महाराष्ट्र

विधानपरिषदेतील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आता पुस्तकबद्ध

राज्यपालांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन

मुंबई: विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, शासनाची उत्तरे आणि त्यानंतर केलेला पाठपुरावा अशा लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष कामकाजाचा लेखाजोखा आता पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन सोमवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवनाच्या जलभूषण सभागृहात झाले.

मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या खंडात २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालावधीत डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेले विविध प्रश्न, त्यावर शासनाने दिलेली उत्तरे आणि संबंधित विषयांवर केलेला पुढील पाठपुरावा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

या प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रवीण दवणे आणि प्रकाशिका मोहिनी कारंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेतील पाच कार्यकाळांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांच्या वाटचालीचे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरून, विरोधी बाकांवरून तसेच उपसभापती म्हणून पीठासीन आसनावरून त्यांनी सभागृहाचे कामकाज अनुभवले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाचे विविध पैलू मांडण्याची क्षमता त्यांच्या लेखनात असल्याचे राज्यपाल म्हणाले. अन्यायग्रस्त महिला आणि बालकांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहणे ही सार्वजनिक जीवनातील अत्यंत मोलाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांच्या पुढील खंडाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुस्तकाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांना लोकप्रतिनिधींनी सभागृहात कोणता प्रश्न मांडला, सरकारने त्यावर काय उत्तर दिले आणि त्यानंतर प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे डॉ. गोऱ्हे यांच्या पुस्तकातून मिळतात. त्यामुळे हा ग्रंथ केवळ कामकाजाचा दस्तऐवज नसून सामाजिक संदर्भग्रंथ ठरतो, असे शिंदे यांनी सांगितले.

पीडित महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेणे, पोलीस व प्रशासनाशी संपर्क साधणे, तसेच संबंधित महिलांना वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि कायदेशीर आधार मिळतो की नाही, याचा पाठपुरावा करण्याची डॉ. गोऱ्हे यांची कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठी तसेच पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांसंदर्भातील राज्यस्तरीय कार्यदलाच्या अध्यक्षा म्हणून त्या करत असलेल्या कामाचेही शिंदे यांनी कौतुक केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या विधिमंडळातील अभ्यासपूर्ण कामकाजाचा गौरव केला. सभागृहात बोलण्यासाठी उभे राहताना त्या कोणत्या नियमाखाली आपला मुद्दा मांडत आहेत, हे सुरुवातीलाच स्पष्ट करत असत. उपसभापती म्हणून काम करतानाही त्यांनी अभ्यास आणि शिस्त कायम राखली, अशी आठवण नार्वेकर यांनी सांगितली.

सभागृहातील गोंधळ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना माध्यमांमध्ये मोठे स्थान मिळते; मात्र एखाद्या प्रश्नासाठी सदस्याने केलेली तयारी, अभ्यास आणि घेतलेले परिश्रम नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. डॉ. गोऱ्हे यांचा हा ग्रंथ हीच उणीव भरून काढणारा आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुस्तक निर्मितीमागील भूमिका विशद केली. नागरिक अनेकदा लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारतात. या प्रश्नांची उत्तरे केवळ आश्वासनांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कामाच्या नोंदींतून मिळावीत, या उद्देशाने हा खंड तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालकांची सुरक्षितता, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, आरोग्य, पर्यावरण तसेच पुणे परिसरातील स्थानिक प्रश्नांवरील चर्चांचा या खंडात समावेश आहे. याशिवाय विधेयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यांवरील कामकाजाचीही माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे स्मरण करत डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत काम करण्याची संधी देणारे तत्कालीन सभापती आणि सहकारी सदस्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी प्रकाशिका मोहिनी कारंडे, विशेष कार्य अधिकारी योगेश जाधव आणि कार्यालयातील सहकाऱ्यांनी सुमारे अडीच वर्षे मेहनत घेतल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

लोकप्रतिनिधींच्या कामाचा पारदर्शक दस्तऐवज

विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांपासून ते शासनाच्या उत्तरांपर्यंत आणि त्यानंतरच्या पाठपुराव्यापर्यंतचा प्रवास एका ठिकाणी उपलब्ध करून देणारा हा चौथा खंड लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल; एकनाथ शिंदे

मुंबई: विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडणाऱ्या…

19 मिनिटे ago

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी

इफ्फीतील परिसंवादात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण घोषणा; सात दिवसांत चित्रीकरण…

21 मिनिटे ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

4 तास ago

दुधात मध घालून प्यायल्याने हाडे व सांधे मजबूत होऊन गाढ झोप लागते

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे.…

4 तास ago

हृदयविकार लक्षणे आणि उपाय

मानवाचे हृदय एक पोकळ मांसपेशीनी बनलेला शरीरातील महत्त्वाचा अवयव असून त्याचा आकार बंद मूठी एवढा…

4 तास ago

चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या चित्रीकरण सुविधांचे जागतिक व्यासपीठावर प्रदर्शन

गोवा : महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पायाभूत सुविधा, चित्रीकरणासाठी उपलब्ध स्थळे, विविध योजना आणि विकासात्मक उपक्रमांची…

4 तास ago