मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या भूमिकेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या संभाव्य पुनर्रचनेत फडणवीस यांना स्थान मिळू शकते, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे या चर्चेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचेही राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस महाराष्ट्रातच राहणार की राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी स्वीकारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाला पक्षाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचे स्थान आहे. सध्या या मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. आता मंडळाची पुनर्रचना होण्याची शक्यता असून काही जुन्या चेहऱ्यांना वगळून नव्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
फडणवीसांसह योगी, हिमंता यांचीही चर्चा
या संभाव्य फेरबदलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावांचीही चर्चा होत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या संसदीय मंडळात एकही मुख्यमंत्री नाही. त्यामुळे राज्यांच्या राजकारणात प्रभावी कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय निर्णयप्रक्रियेत स्थान देण्याबाबत भाजपमध्ये विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस सध्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे संसदीय मंडळातही त्यांचा समावेश झाल्यास पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फडणवीस महाराष्ट्र सोडणार?
फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेची चर्चा नवीन नाही. मात्र, स्वतः फडणवीस यांनी अनेकदा महाराष्ट्रातच राहून काम करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे संसदीय मंडळातील संभाव्य नियुक्तीचा अर्थ ते मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात जाणार, असा थेट काढता येणार नाही. उलट महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळतानाच राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना अधिक महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातही राजकीय चर्चेला उधाण
फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेच्या चर्चेवरून महाराष्ट्रातील राजकारणही तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी फडणवीस दिल्लीला जाण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यावर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर फडणवीस यांनी २०२९ पूर्वी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा भाजपचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भाजपच्या संसदीय मंडळाच्या संभाव्य पुनर्रचनेत फडणवीस यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील भविष्यातील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्रातच राहण्याची भूमिका फडणवीसांनी कायम ठेवली असली, तरी दिल्लीच्या सत्ताकारणात त्यांचे नाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येणे हे भाजपच्या आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…