महाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्यकारभार करण्याची ग्वाही देत चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडपुते, आमदार अमोल खताळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या, तर न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि जनतेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या युगप्रवर्तक होत्या. त्यांच्या कार्याचे स्मरण झाले की न्याय, धर्म, लोककल्याण आणि आदर्श राज्यकारभाराचे दर्शन घडते, असे शिंदे यांनी सांगितले.

चौंडीच्या विकासासाठी राज्य सरकारने सुमारे 1200 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चौंडी हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि अस्मितेचे पवित्र स्थळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले, याची आठवण करून देताना शिंदे यांनी सरकारच्या निर्णयक्षमतेवर भर दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून त्या विचारांचा विस्तार देशभर केला, असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले. धर्म, संस्कृती, न्याय आणि मानवतेचा समन्वय साधणाऱ्या अहिल्यादेवी आजही समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे ते म्हणाले.

जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील अहिल्यादेवींची दूरदृष्टी अधोरेखित करताना शिंदे यांनी जलयुक्त शिवार, जलसंधारण आणि विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य सरकार त्याच विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगितले. गोदा-नर्मदा जोड प्रकल्प हा विकासासोबतच संस्कृती आणि जलसंवर्धनाशी संबंधित महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही देत त्यांनी विविध कृषी कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. राज्यात चांगला पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, स्त्री ही राष्ट्रनिर्मितीची प्रमुख शक्ती आहे. अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व आणि स्वावलंबनाची प्रेरणा दिली. त्याच विचारातून राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून ही योजना कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

चौंडीच्या विकासासाठी आवश्यक सर्व निर्णय आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत, विकास आणि संस्कृती यांचा समतोल साधत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करणे हीच अहिल्यादेवींना खरी आदरांजली ठरेल, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

1 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

1 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

2 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

18 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

18 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

18 तास ago