पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
पुणे: स्वर्गीय अजित पवार यांचे कार्य एका पुतळ्याच्या चौकटीत मावणारे नाही. पुणे आणि बारामतीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, दूरदृष्टी, प्रशासनावरील विलक्षण पकड आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने आणि हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावपूर्ण प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची वेळ आपल्यावर येईल, यावर आजही विश्वास बसत नसल्याची भावना व्यक्त करत शिंदे म्हणाले, की २८ जानेवारी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठा असलेला भाऊ गमावल्याचे दुःख मनात आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.
विकासकामांची पाहणी करताना एखाद्या वास्तूतील वायर बाहेर आली आहे का, रंगकाम अपूर्ण आहे का, याकडेही अजितदादा बारकाईने लक्ष द्यायचे. प्रकल्पांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा. प्रशासनावरील त्यांची पकड आणि क्षेत्रातील अभ्यास विलक्षण होता. वरिष्ठ सनदी अधिकारीही त्यांच्या प्रश्नांसमोर निरुत्तर होत असत. कठोर निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही त्यांची खासियत होती. विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता विधायक सूचना केल्या. अधिवेशनात शेवटपर्यंत बसून काम करण्याची त्यांची वृत्ती अनुकरणीय होती.
योजनेच्या लाभार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेणारे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणारे अजितदादा हे संवेदनशील नेतृत्व होते. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणासोबतच त्यांच्यात विलक्षण प्रेमळपणाही होता. त्यामुळेच लोक त्यांना गर्दीतून ‘दादा’ म्हणून हाक मारत असत.
मेट्रो, रिंगरोड यांसारख्या प्रकल्पांद्वारे पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधणे आणि बारामतीचा नियोजनबद्ध विकास करणे, असे त्यांचे व्हिजन होते. अर्थमंत्री म्हणून आर्थिक शिस्त पाळताना ‘आपले पांघरूण पाहून हातपाय पसरावेत’ हा त्यांचा स्पष्ट संदेश असायचा. ऊस उत्पादक, कांदा उत्पादक आणि सहकार क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. प्राप्तिकराच्या प्रश्नातून साखर कारखान्यांना दिलासा मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत टीम म्हणून काम केले. राजकारणापलीकडची नाती जपणारे अजितदादा आम्हाला मार्गदर्शन करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सुनेत्रावहिनी पवार यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी स्वीकारली असून, संपूर्ण महायुती त्यांच्या आणि पवार कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला कृषिमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार उपस्थित होते. तसेच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सभापती अमोल नलावडे, दीपाली हुल्लावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांच्यासह विविध मान्यवरांनी सोहळ्याला हजेरी लावली.
आठ ठिकाणी चोरीची कबुली; १७० किलो तांब्याच्या तारा जप्त, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…
९५ हजारांची लाच घेऊन झाला होता पसार; शिरूर नगरपरिषद परिसरातून एसीबीने ठोकल्या बेड्या शिरूर (अरुणकुमार…
आंध्र प्रदेशात पाच दिवस मुक्काम; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची गाडी…
शिंदोडी (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब…
शिक्रापूर, ता. १६ नोव्हेंबर २०२६ (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे…
जेवण केल्यानंतर अनेकदा अनेकांना छातीत जळजळ होते. ज्याला हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. छातीत…