नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरे करणे स्वागतार्ह आहे; मात्र केवळ पाहणी करून उपयोग नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करून त्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मागील वर्षी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती. त्यावेळी २५३ तालुके आणि सुमारे ६८.७ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, घोषित मदतीपैकी प्रत्यक्षात निम्मीच रक्कम खर्च करण्यात आली, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकार मोठमोठ्या घोषणा करते; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी तसेच सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. “पीकच हातात येणार नसेल तर शेतकरी कर्जाची परतफेड कशी करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारने पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन बोलवावे आणि सत्ताधारी व विरोधकांना विश्वासात घेऊन मदतीचे पॅकेज निश्चित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतील पैसा आधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, असे वडेट्टीवार म्हणाले.
केंद्र सरकार गुजरातला भरघोस मदत करते; मात्र महाराष्ट्राने मदत मागितल्यानंतर अपेक्षित मदत मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मदत देण्यास विलंब झाल्यास पाणी, जनावरांचा चारा आणि टँकरची समस्या आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करावी, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना एका मंत्र्यांच्या मुलाचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आल्यावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. “इतकी गंभीर परिस्थिती असताना त्याचे भान न ठेवता मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची गरज होती का?” असा सवाल करत सरकार आणि मंत्री असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली.
निवडणूक आयोगावरही निशाणा
‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या निर्णयांवर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादीशी संबंधित सॉफ्टवेअरच्या केंद्रीकरणाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
Form-6 मधील बदलांबाबतही दोन्ही आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम ‘व्होटचोरी’चा आरोप केला होता आणि आता तो सिद्ध झाल्याचा दावा करत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही तीव्र टीका केली.
SIR आणि Form-6 च्या माध्यमातून आणलेले नवीन नियम मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित करू शकतात, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “पुढची पिढी मतदारयादीत दिसणार नाही, असा डाव या नियमातून दिसून येतो,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
विधान परिषद जागांवर काँग्रेसची मागणी
विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागा काँग्रेसला सोडण्यात याव्यात, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.
लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…
संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…
जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…
मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…
मुंबई: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘राजकीय वळण’ लागल्याचा आरोप करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना बगल देण्याचा…