महाराष्ट्र

संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही; एकनाथ शिंदेंचा ठाम निर्धार

अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने राज्य सरकार काम करत असून, संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ह.भ.प. रामगिरी महाराज, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, रमेश बोरनारे, विवेक कोल्हे, आशुतोष काळे, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह संत-महंत आणि हजारो भाविक उपस्थित होते.

गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या भूमीला नमन करत शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या वृद्धीसाठी १७९ वर्षांपूर्वी सुरू झालेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही भक्तिभावाने सुरू आहे. अखंड नामस्मरणामुळे परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहात सहभागी होणारा प्रत्येक भाविक हा विठ्ठलस्वरूप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘गावाची एकी तर देवाची कृपा नक्की’ याचा प्रत्यय या सप्ताहातून येत असल्याचे शिंदे म्हणाले. जातीभेद, श्रीमंत-गरीब असा भेद विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी एकत्र येणे हीच संतपरंपरेची खरी ताकद आहे. आठ ते दहा हजार वारकरी एकाच तालात १६८ तास भजन करतात. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली असली, तरी विठ्ठलाच्या भक्तीपुढे कोणताही जागतिक विक्रम छोटाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिंदे यांनी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचाही उल्लेख केला. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच बळीराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्यापोटी पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काकड आरती, ज्ञानेश्वर महाराजांची गाथा, भगवद्गीतेचे पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘घ्यायचे असेल तर हरिनाम, द्यायचे असेल तर अन्नदान; जगायचे असेल तर नम्रता आणि बुडायचे असेल तर अहंकार’, हा संतांचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

संतपरंपरा, हिंदू संस्कृती आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत ‘हे सरकार सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, लाडक्या बहिणींचे, वारकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे,’ असे शिंदे म्हणाले. संत-महंतांच्या आशीर्वादातून सरकारला प्रेरणा मिळत असल्याचे सांगत त्यांनी रामगिरी महाराज आणि सप्ताहाच्या आयोजकांचे अभिनंदन केले. अखंड नामाचा गजर आणि पांडुरंगाचा आशीर्वाद कायम राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

6 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

6 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

6 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

7 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

7 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

12 तास ago