शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
डोंबिवली : राज्यातील दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत आणि दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक दुष्काळग्रस्त भागांत रवाना करण्याची घोषणा त्यांनी केली. डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पारंपरिक दांडियाऐवजी भजनसंध्या आणि संगीत कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. या उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या ‘रासरंग दांडिया’ उपक्रमाचा निधी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येत आहे.
शनिवारी या उत्सवाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचे दर्शन घेतले. दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावेत, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मदतीचा हात देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
महिलांच्या स्वावलंबनासाठी शिलाई मशीन; मुलींच्या विवाहालाही आधार
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असताना त्यांना केवळ तात्पुरता दिलासा नव्हे, तर उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले. शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे मोठ्या संख्येने ट्रक दुष्काळग्रस्त भागांत रवाना करण्यात येतील. या माध्यमातून संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा जागर
डोंबिवलीतील नवरात्रोत्सवात यंदा भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने आयोजित भजनसंध्येत कोकणातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. देवीची भजने, श्री गणेशाची भजने आणि पारंपरिक भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे सभामंडप भक्तिरसात न्हाऊन निघाला.
“महाराष्ट्र ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. आपल्या राज्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. भक्तिगीते, भजने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वारसा जपण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा उत्सवांमुळे समाज एकत्र येतो आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनही समाजाशी जोडलेले आहेत, असे नमूद करत शिंदे यांनी नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणे
डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद नांदावा, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. कोकणच्या लोकपरंपरेतून व्यक्त झालेल्या या गाऱ्हाण्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. भक्तीभावासोबतच शेतकऱ्यांच्या वेदनांशी जोडलेली सामाजिक संवेदनशीलताही या उपक्रमातून अधोरेखित झाली.
शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश सुपूर्द
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा कणा असून, संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
डोंबिवलीतील या नवरात्रोत्सवातून एका बाजूला भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर करण्यात आला, तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीचा संदेश देण्यात आला. सांस्कृतिक उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न या आयोजनातून करण्यात आला.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…