महाराष्ट्र

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी तब्बल २९०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजाला एकत्र आणणारी तसेच संस्कृती आणि परंपरा जपणारी मोठी परंपरा आहे, असे शिंदे म्हणाले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. आजही सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक प्रबोधन, विविध विषयांवरील देखावे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आनंद दिघे यांनी गणेशोत्सव स्पर्धेला सुरुवात करून उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड दिली. ठाण्यातील गणेशोत्सवाची ही परंपरा पुढे नेण्याची गरज असून, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी यांसारखे सण अधिक व्यापक स्वरूपात साजरे झाले पाहिजेत आणि ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची मोठी इच्छा असते. मात्र, प्रत्येकाला रेल्वे किंवा अन्य वाहतुकीचे तिकीट मिळेलच असे नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धारही शिंदे यांनी व्यक्त केला.

कोरोना काळानंतर सण-उत्सवांवरील निर्बंध हटवून नागरिकांना उत्साहाने सण साजरे करता यावेत, यासाठी सरकारने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील विविध निर्णयांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही आपल्या कार्यकाळातील सर्वाधिक समाधान देणारी योजना असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या योजनेमुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांशी ‘लाडका भाऊ’ म्हणून आपले नाते निर्माण झाले, याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, नावासमोर आईचे नाव लावण्याचा निर्णय, कौशल्य विकास, स्टार्टअप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन अशा विविध योजना राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गणेशभक्तांनी उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करावा, अशा शुभेच्छा देत शिंदे यांनी या उपक्रमासाठी आयोजकांचे आभार मानले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक राजेश मोरे, अनिल भोर, विभागप्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 मिनिटे ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

8 मिनिटे ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

13 मिनिटे ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

40 मिनिटे ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

14 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

14 तास ago