त्रंबकेश्वर: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानावर आधारित देश उभारण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. मात्र या विचारधारेच्या विरोधात लोकांना लाचार बनवणारी, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. संविधानविरोधी मनुवादी विचारसरणीवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी संविधानवादी विचार स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी आयोजित दोन दिवसीय निवासी कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, अॅड. संदीप पाटील, प्रकाश सोनावणे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष रमेश कहांडाळ, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, प्रवक्ते हनुमंत पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सपकाळ पुढे म्हणाले की, राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर विशेष लोकांच्या हाती असावी हा संघाचा विचार आहे. सत्ता, संपत्ती, द्वेष आणि भयाच्या आधारे धर्मांध राजकारण केले जात आहे. “अब की ४०० पार” हा नारा संविधान बदलण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसची विचारधारा समता, बंधुता, शांतता, स्त्री-पुरुष समानता आणि सर्वांना न्याय देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा काँग्रेस पुढे नेत असल्याचेही ते म्हणाले.
समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वसंत पुरके यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. भाजप ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती राबवत असून जाती-धर्मात भांडणे लावून राजकीय फायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे ओबीसी, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण व अधिकार मिळाले आणि ते मुख्य प्रवाहात आले, असेही ते म्हणाले. मात्र सध्याचे सरकार या घटकांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुलकर्णी, शाह आलम शेख आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.
आधारतीर्थ आश्रमाला सपकाळ यांची भेट
कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्र्यंबकेश्वरजवळील आधारतीर्थ आश्रमाला भेट दिली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देणाऱ्या या आश्रमात सुमारे ३०० हून अधिक मुले-मुली शिक्षण घेत आहेत. मुलांनी सादर केलेल्या ‘शेतकरी आत्महत्या थांबवा’ या संदेश देणाऱ्या नाटकाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन आणि संग्राम खोपडे उपस्थित होते.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…