मुख्य बातम्या

मलठणमध्ये शासकीय पाझर तलावाचा जलप्रवाह अडविल्याचा आरोप; सहा शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव!

मातीचे बांध आणि प्लास्टिक आच्छादनामुळे पाणी अडविल्याची तक्रार; विहिरींची पाणीपातळी खालावली, उभी पिके धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथे शासकीय रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाचा नैसर्गिक जलप्रवाह खासगी जमीनमालकाने अडविल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मातीचे मोठमोठे बांध घालून त्यावर प्लास्टिकचे आच्छादन केल्याने तलावाला येणारे पावसाचे पाणी रोखले जात असल्याची तक्रार सहा शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या प्रकारामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावली असून उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

याप्रकरणी सचिन रामचंद्र शिंदे, दत्तात्रय शिवराम शिंदे, विनायक रामचंद्र विदे, सुहास तुकाराम शिंदे, कृष्णराव खंडूजी शिंदे आणि सुभाष सीताराम शिंदे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. गट क्रमांक १०१ चे जमीनमालक विलास पालरेषा यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

१९७२ च्या दुष्काळात उभारला होता पाझर तलाव!

सन १९७२-७३ मधील भीषण दुष्काळाच्या काळात शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मलठण येथील गट क्रमांक ६५ आणि ८५ मध्ये या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध होत होते. तलावातील पाण्याच्या पाझरामुळे भूजल पातळी टिकून राहत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती बारमाही सिंचनाखाली होती.

या तलावाला पश्चिमेकडील गट क्रमांक १०१ तसेच लगतच्या वनक्षेत्रातून नैसर्गिक नाल्याद्वारे पावसाचे पाणी येत होते. मात्र, संबंधित जमीन खरेदी केल्यानंतर नैसर्गिक जलप्रवाहाच्या मार्गावर मातीचे मोठे बांध घालण्यात आले. त्यावर प्लास्टिकचे आच्छादन करून पाणी पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

तलाव कोरडा, विहिरींची पाणीपातळी खालावली; पिके संकटात!

नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे पाझर तलावात पाणी येणे बंद झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. परिणामी तलाव कोरडा पडत असून परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीवरही त्याचा परिणाम होत आहे. विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून पाण्याअभावी उभी पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती आणि आर्थिक अस्तित्व टिकविण्याचे संकट उभे राहिले आहे.नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून खालच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे.

तहसीलदारांनी तातडीने स्थळपाहणी करावी!

या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यामार्फत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पंचनामा करावा, नैसर्गिक जलप्रवाह अडविणाऱ्या बांधांची चौकशी करावी आणि नियमबाह्य बांधकाम आढळल्यास ते तातडीने हटवून पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

एकीकडे शासन जलसंधारण आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे, तर दुसरीकडे शासकीय निधीतून उभारलेल्या पाझर तलावाचा नैसर्गिक जलप्रवाहच अडविला जात असल्याचा आरोप समोर येत आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती कारवाई करते, याकडे मलठण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

9 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

9 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

9 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

9 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

9 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

9 तास ago