रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या कडेला असणाऱ्या रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव, बाभुळसर खुर्द या गावांमध्ये औद्योगिक नियम आणि पर्यावरणाच्या संबंधित कायद्यांना केराची टोपली दाखवत धोकादायक केमिकल आणि कचरा दिवसाढवळ्या जाळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगाव, बाभुळसर खुर्द, सोनेसांगवी यांसह परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विषारी धुराने रांजणगाव गणपतीसह परिसरातील गावांचा श्वास कोंडला असुन लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असताना स्थानिक ग्रामपंचायतीसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औद्योगिक विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना विषारी धूर श्वासावाटे घेण्यास भाग पाडले जात असेल, तर या प्रदूषणाला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण होणाऱ्या धोकादायक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना, काही स्थानिक ठेकेदारांकडून ‘आमचं कोणीच काही वाकड करु शकत नाही’ या अविर्भावात हा कचरा थेट उघड्यावर जाळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दिवसाढवळ्या सुरु असुनही संबंधित स्थानिक ग्रामपंचायत किंवा इतर सरकारी यंत्रणा याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. कचरा जाळल्यानंतर परिसरात पसरत असलेला दाट धूर आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही त्रासदायक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
या प्रदूषणाचा सर्वाधिक जास्त फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि श्वसनविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींना बसण्याची भीती आहे. सततच्या धुरामुळे खोकला, डोळ्यांची जळजळ, घशाची खवखव आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक ठेकेदारांना अभय कोणाचे..?
रांजणगाव MIDC तुन आणलेला कचरा जाळण्याच्या प्रकारामागे स्थानिक ठेकेदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. संबंधित ठेकेदार स्थानिक असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे. अर्थात, या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा प्रकार सुरु असल्यास ग्रामपंचायतीने त्याची दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणे आणि पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. केवळ राजकीय किंवा स्थानिक संबंधांमुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असेल, तर ही बाब अधिक गंभीर आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद…?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) जबाबदारी औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आहे. असे असताना रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या आजुबाजूला असणाऱ्या गावात जर उघडपणे धोकादायक कचरा जाळला जात असल्याच्या तक्रारी येत असतील, तर मंडळाचे अधिकारी नेमके काय करत आहेत…? त्या गोष्टीची नियमित तपासणी होते का…? संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत का…? कचरा जाळणाऱ्या ठिकाणचे हवेचे नमुने तपासले आहेत का…? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेला देणे आवश्यक आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई करावी…
या प्रकरणात संबंधित ठिकाणांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करुन कचरा जाळण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत. जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याचे स्वरुप निश्चित करण्यासाठी नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी. परिसरातील हवेची गुणवत्ता तपासून अहवाल सार्वजनिक करावा. दोषी ठेकेदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर पर्यावरणविषयक कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी. तसेच ग्रामपंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक विकास होत असला, तरी त्या विकासाची किंमत स्थानिक नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या रुपाने का मोजावी…? उद्योगांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना स्वच्छ हवा आणि सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. आता प्रश्न एकच आहे कि रांजणगावसह ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव आणि बाभुळसर खुर्द येथील नागरिकांचा श्वास मोकळा करण्यासाठी प्रशासन कडक पाऊले उचलणार का…? की एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणांना जाग येणार…? हे येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळेल.
(क्रमश:)
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…
फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…
शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…
‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…
सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…
मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…