मुख्य बातम्या

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र पशु संरक्षण’ कायद्याचा हेतू जरी चांगला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असल्याचे धक्कादायक चित्र शिरुर तालुक्यातील तांदळी परिसरात समोर आले आहे. उपयोगात नसलेल्या वासरांचा सांभाळ करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाल्याने काही जणांकडून रात्रीच्या अंधारात वासरे रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर अथवा गावाबाहेरील माळरानावर सोडून देण्याचे प्रकार वाढले आहेत.

‘महाराष्ट्र पशु संरक्षण’ कायद्यानुसार गाय, बैल आणि बैलांची कत्तल करण्यास बंदी आहे. गाय या व्याख्येत गायीच्या नर आणि मादी वासरांचाही समावेश होतो. तसेच कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक, विक्री, खरेदी किंवा अन्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, कायद्यात सर्वसाधारण शेती अथवा संगोपनासाठी होणाऱ्या विक्रीवर पुर्ण बंदी नसली, तरी गैरसमज, कायदेशीर कारवाईची भीती आणि उपयोग नसलेल्या नर वासरांसाठी खरेदीदारांचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याचे वास्तव आहे.

तांदळी आणि आजूबाजूच्या तीन ते चार किलोमीटर परिसरात गेल्या तीन महिन्यांत किमान आठ ते दहा वासरे बेवारस अवस्थेत आढळून आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. यातील काही वासरे रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत जखमी होत आहेत. काहींचा ऊन, पाऊस, थंडी, उपासमार आणि उपचारांअभावी मृत्यू होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या बेवारस वासरांमुळे तांदळी-मांडवगण रस्त्यावरील वाहनचालकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का…? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

तर दुसरीकडे, गावातील भटकी कुत्री या असहाय वासरांवर हल्ले करत आहेत. जखमी अवस्थेतील वासरे अनेक दिवस मदतीविना तडफडत पडलेली दिसतात. गोवंश संरक्षणाचा कायदा असताना त्याच गोवंशाला रस्त्यावर उपाशी, जखमी आणि बेवारस अवस्थेत मरावे लागत असेल, तर हे नेमके कसले संरक्षण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

वासरे किंवा जनावरे बेवारस सोडणे हा निश्चितच गंभीर आणि अमानवी प्रकार आहे. अशा व्यक्तींवर ‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक’ कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. मात्र, केवळ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च, औषधोपचार, पाणी आणि देखभालीची जबाबदारी कोण घेणार, याचे उत्तर शासनाला द्यावे लागणार आहे.

प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात पुरेशा क्षमतेची गोशाळा उभारणे, बेवारस जनावरांसाठी निवारा केंद्र सुरु करणे, नोंदणी आणि हस्तांतरणाची पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे, तसेच जनावरांचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देणे आवश्यक आहे. अन्यथा कागदावर गोवंशाचे संरक्षण आणि प्रत्यक्षात रस्त्यावर त्यांचा मृत्यू, अशी विरोधाभासी परिस्थिती कायम राहणार आहे.

या गंभीर प्रश्नाकडे पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच शिरुर तालुका पशुसंवर्धन विभागाने तातडीने लक्ष द्यावे. तांदळी परिसरातील बेवारस वासरांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित गोशाळेत हलवावे आणि जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी फत्तेसिंग गदादे आणि संतोष भाऊसाहेब कळसकर यांनी केली आहे.

कायदा आणि वास्तवातील दरी…

गोवंशाच्या कत्तलीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. मात्र उपयोगात नसलेल्या जनावरांच्या आयुष्यभराच्या संगोपनाची यंत्रणा उभी करणे हि देखील शासनाचीच जबाबदारी आहे. कायदा करणाऱ्या सरकारने पर्यायी व्यवस्था केली नाही. तर आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी, रस्त्यावर सोडलेले जनावर आणि अपघाताच्या धोक्यातील नागरिक या तिघांनाही त्याची किंमत मोजावी लागणार आहे. सरकारने कायदा केला, पण जनावरांच्या संगोपनाची व्यवस्था कोण करणार…? असा संतप्त सवाल सर्व सामान्य नागरीक प्रशासनाला विचारत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago