Shirur Police Station
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य आणि सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर १९ मार्च २०२६ रोजी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटो न लावल्याच्या कारणावरुन दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार केला. या घटनेत खुनाचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात शिरुर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तसेच शस्त्र अधिनियम कलम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले (वय ३१, रा. मांडवगण फराटा) यांनी फिर्याद दिली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यात शिरुर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तसेच शस्त्र अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय गोविंद पाटील (वय २९, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली होती.
या दोन्ही गुन्ह्यांमध्ये गावठी पिस्तुलचा वापर करुन परस्परांवर गोळीबार करण्यात आला होता. यापुर्वी या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले होते. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार होते. मात्र मुख्य आरोपींचा शोध सुरुच होता.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय ऊर्फ ईश्वर गोविंदा पाटील (वय ३१, सध्या रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरु.र, मूळ रा. गोद्री, ता. जामनेर, जि. जळगाव) आणि सत्यम ऊर्फ पप्पू दत्तात्रय कड (वय २६, रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. दोघेही सराईत व संघटित गुन्हेगारी करणारे आरोपी असल्याने पोलीस त्यांचा कसुन शोध घेत होते.
अक्षय पाटील याच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत मारामारी, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, आर्मअॅक्ट आदी गंभीर स्वरुपाचे तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०२३ मध्ये एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. तर सत्यम ऊर्फ पप्पू कड याच्याविरोधात मारामारी, खून, आर्मअॅक्ट सह गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. तो चाकण पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातही फरार आरोपी आहे.
वेषांतर करुन राहत होते आरोपी…
दोन्ही आरोपी सतत राहण्याचे ठिकाण बदलत होते. स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेषांतर करुन राहत होते. मोबाईल फोनचा वापर टाळत होते तसेच नातेवाईक किंवा मित्रांशी संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की हे दोन्ही आरोपी सातारा जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने विशेष तपास पथक सातारा येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ७ जून २०२६ रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपींकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई…
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरुरचे उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, हनुमंत पासलकर, तसेच पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, तुषार भोईटे, सागर नामदास, धीरज जाधव यांनी सहभाग घेतला. तसेच शिरुर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार निरज पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोई, नितेश थोरात, निखिल रावडे, अंबादास थोरे, दादाराव नागरे, अजय पाटील व भालसिंग यांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
क्रिकेट स्पर्धेतील बॅनर वादातून गोळीबारापर्यंत…
हा केवळ क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फोटो न लावल्याच्या किरकोळ कारणातून सुरु झालेला वाद थेट गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नापर्यंत पोहोचल्याने मांडवगण फराटा परिसर हादरला होता. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद झाल्याने तपासाला अधिक गती मिळणार असुन उर्वरित बाबींचा तपास शिरुर पोलीस करत आहेत.
रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल
शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…