बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन आरोग्यदायी जीवन जगणे आणि दीर्घायुषी होणे सहज शक्य आहे. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात, सर्वच रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध असेल किंवा मुख्य धमनीमध्ये अवरोध असेल किंवा ज्या अवरोधाची अॅन्जिओप्लास्टी करणे अशक्य किंवा धोकादायक आहे अशा वेळी वैद्यकीय औषधोपचारासोबत बायपास सर्जरीचा सल्ला दिला जातो.
बायपास सर्जरी म्हटले की, हृदयात ‘धस्स’ व्हायला होते. प्रत्येकाला बायपास सर्जरीची भीती वाटत असते. सर्जरीचे सहा-सात तास त्याला लागणारी भूल, तीन-चार दिवसांचे आयसीसीयूमध्ये राहणे, जखमा. जखमाचे व्रण, टाके, इन्फेक्शन, येणारा थकवा, मानसिक ताणतणाव हे सर्व काही जीवघेणे असते. शिवाय दोन-तीन लाखांचा खर्च.. ऑपरेशनची शाश्वती ९५ ते ९८ टक्केच असते.. पुन्हा अवरोध होण्याची शक्यता, पण २ ते ३ टक्के, दर वर्षांला असतेच.. या सर्व विचारांनी बायपास सर्जरी म्हटले की, मन खचून जाते.
पण आता बायपास शस्त्रक्रिया खूप सोपी आणि सहज झाली आहे. पूर्वीइतका वेळही लागत नाही, त्रासही होत नाही, टाकेही कमी पडतात, सुधारणाही लवकर होते.. रुग्णालयातून सुट्टीही लवकर होते. शस्त्रक्रियेत गुंतागुंत व मृत्यूचं प्रमाणसुद्धा फार कमी झाले आहे. बायपासनंतर जीवनाचा दर्जाही उंचावतो.. काही त्रासाशिवाय जगता येते. तसेच बायपास सर्जरीबद्दल सर्वाना बऱ्यापैकी माहिती असते, त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता कमी झाली असून बायपासचा सल्ला दिल्यानंतरची मानसिक चलबिचलही कमी झाली आहे.
बायपास शस्त्रक्रिया म्हणजे काय
हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळय़ाच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था करणे यालाच बायपास सर्जरी असे म्हणतात. बायपास सर्जरीमध्ये अडथळ्यांना बायपास करण्यासाठी ज्या रक्तवाहिन्यांचा वापर केला जातो त्यांना ‘ग्राफ्ट’ असे म्हणतात. पायाच्या अशुद्ध रक्त वाहणाऱ्या रक्तवाहिन्या, हाताची शुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी आणि छातीच्या पिंजऱ्यामधील रक्तवाहिन्या या ग्राफ्ट म्हणून वापरल्या जातात.
बायपास सर्जरीच्या पद्धती
१) ओपन हार्ट सर्जरी (Open Heart Surgery)
२) बीटिंग हार्ट सर्जरी (Beating Heart Surgery)
ओपन हार्ट सर्जरी (Open Heart Surgery)
या पारंपरिक पद्धतीमध्ये हृदय आणि फुप्फुसाची क्रिया काही काळ बंद करून, हार्ट-लंग, मशीनच्या माध्यमाद्वारे शरीराला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवून हृदयाच्या रक्तवाहिन्यांना ग्राफ्ट जोडण्यात येतात. या रक्तवाहिन्या जोडल्यानंतर हार्ट-लंग मशीन बंद करून हृदय शॉक देऊन पुन्हा चालू केले जाते.
बीटिंग हार्ट सर्जरी
या सर्जरीमध्ये हृदयाची क्रिया चालू असते. हृदयाची गती कमी करून त्या रक्तवाहिनीवर ग्राफ्ट टाकायचा आहे, तो भाग ‘ऑक्टोपस’ या स्टॅबिलायझर वापरून स्थिर केला जातो आणि त्या रक्तवाहिनीवर अडथळय़ाच्या पुढे ग्राफ्ट टाकला-जोडला जातो. मग हाच स्टॅबिलायझर काढून दुसऱ्या रक्तवाहिन्यांच्या भागावर वापरून दुसरा ग्राफ्ट जोडला जातो. अशा तऱ्हेने वेगवेगळय़ा रक्तवाहिन्यांवर वेगवेगळय़ा ठिकाणी ग्राफ्ट टाकले जातात. या सर्व प्रक्रियेत हृदयक्रिया सतत चालू असते.
या हार्ट लंग मशीनचा वापर होत नसल्यामुळे हार्ट लंग मशीनचे रक्तावर होणारे हानिकारक परिणाम टाळले जातात. ‘ऑक्टोपस’शिवाय कोणतेही साहित्य न लागण्यामुळे खर्चाचे प्रमाण कमी होते. हृदयक्रिया सतत चालू असल्यामुळे रुग्णाची सर्जरीनंतर सुधारणा फार लवकर नि चांगली होते. गुंतागुंतीचे प्रमाणसुद्धा कमी होते. कृत्रिम यंत्रणेचा वापर कमी होऊन आयसीसीयूमधील मुक्काम लवकर हलवता येतो.
वेगवेगळे ग्राफ्ट
१) छातीच्या आतील रक्तवाहिन्या
यांना इंटर्नल मॅमरी आर्टरीज म्हणतात. त्यातील डाव्या बाजूची ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते आणि ती हृदयाच्या डाव्या रक्तवाहिनीला जोडली जाते. या रक्तवाहिनीचे ग्राफ्टचे वैशिष्टय़ असे की, यांचे अरुंदीकरण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हे गोल्ड स्टॅण्डर्ड आहे.. बायपास सर्जरीचे.
आता उजवी इंटर्नल मॅमरी आर्टरीही पण पुष्कळ वेळा वापरली जाते. जर वापरली तर पायांची किंवा हाताची शीर वापरण्याची गरज भासत नाही. या सर्जरीला ‘टोटल अर्टेरीअल बायपास सर्जरीअसे म्हणतात. यांचे रिझल्ट खूपच छान असतात आणि यात पुन्हा अवरोध होण्याची शक्यता खूपच कमी असते. १५ ते २० वर्षे ही ग्राफ्ट टिकू शकतात. कधी कधी वयस्कर लोकांमध्ये लिमा व रिमा या दोन्ही इंटर्नल मॅमरी आर्टरीज वापरल्या, तर छातीच्या मधोमध असलेल्या हाडाचा (स्टर्नम) रक्तपुरवठा कमी होऊन तेथील जखम भरून येण्यास जास्त वेळ लागू शकतो किंवा तेथे इन्फेक्शन होण्याचा संभव वाढतो. म्हणून वयस्कर लोकांमध्ये एक लिमा आणि एक हाताची किंवा पायाची शीर वापरली जाते.
२) पायाची शीर
हिला सॅफेनस व्हेन असे म्हणतात. ही अशुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी आहे. बायपास सर्जरीमध्ये या व्हेनचा वापर खूप वर्षांपासून खूप प्रमाणात होतो. पायांमध्ये अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या तीन समांतर रक्तवाहिन्या असतात. त्यातील एखादी काढून घेतली तरी उरलेल्या दोन सिस्टीम काढलेल्या रक्तवाहिनीचे कार्य करतात म्हणून सॅफेनस व्हेन काढली तरी पायाच्या रक्ताभिसरणात विशेष फरक पडत नाही. कधी कधी काही काळासाठी पायावर सूज येऊ शकते.
ही शीर बायपास सर्जरीमध्ये ग्राफ्ट म्हणून वापरल्यास, तिचे पुन्हा अरुंद होण्याचे प्रमाण लिमा पेक्षा खूप अधिक आहे. सर्वसाधारणपणे सॅफेनस व्हेन ग्राफ्ट दहा वर्षांत बंद होण्याचे प्रमाण ९०-९५ टक्के आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, हे व्हेन ग्राफ्ट आहेत.. त्यांना अर्टेरिअल दाब सहन होत नाहीत म्हणून ते बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याचा वापर आता कमी होऊ लागला आहे. सर्जन आता ‘टोटल अॅर्टेरिअल बायपास सर्जरी’कडे वळू लागले आहेत.
३) हाताची शीर
डाव्या किंवा उजव्या हातातील मनगटाजवळील रॅडिअल आर्टरी ही उत्तम ग्राफ्ट आहे. तिच्यात पुन्हा अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण पायातील नसेपेक्षा खूप कमी आहे आणि टिकण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे या ग्राफ्टचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.
बायपास सर्जरीसाठी घेतलेले वेगवेगळे छेद
१) छातीच्या मध्यभागी उभा छेद हा सर्वात सर्वमान्य छेद आहे. छातीच्या मधोमधील ‘स्टर्नम’ हाडाला कापून हृदयावर शस्त्रक्रिया केली जाते. या छेदाद्वारे हृदयाचे आणि फुप्फुसाचे अवलोकन सहजपणे केले जाऊ शकते आणि आतील अवयव हाताळण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होते.
२) आडवा छेद: डाव्या बाजूला दोन फासळ्यांच्या मध्ये छोटय़ा प्रमाणात आडवे छेद घेऊन मर्यादित स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करता येतात. स्त्रियांमध्ये सौंदर्याच्या दृष्टीने हा व्रण कपडय़ाखाली झाकला जातो. मिकास किंवा दुर्बिणीतून शस्त्रक्रिया अशा छोटय़ा छेदातून केल्या जातात.
बायपास सर्जरी कशी करतात
अँजिओग्राफी तपासणीमध्ये कळले की, अवरोध हा खूप आहे आणि सर्व रक्तवाहिन्यांमध्ये आहे किंवा मुख्य रक्तवाहिनीमध्ये आहे.. किंवा जेथे अँजिओप्लास्टी करणे शक्य नाही, तेव्हा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. वैद्यकीय तज्ज्ञ आणि सर्जनना बायपास शस्त्रक्रिया ही अत्यंत सहज आणि सोपी नित्याची बाब झालेली आहे. यात जोखीम आणि मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. तज्ज्ञ डॉक्टर तज्ज्ञांची टीम आणि चांगले सर्व सुविधांनी युक्त असलेले रुग्णालय असेल तर या बायपास सर्जरीचे गुंतागुंत होण्याचे आणि त्यातून रुग्णाचे मृत्यू पडण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
सहसा बायपास सर्जरीसाठी रुग्णाला एक-दोन दिवस आधी रुग्णालयात भरती करण्यात येते. रक्त पातळ करण्याच्या गोळय़ा पाच दिवस आधी बंद करण्यात येतात. रक्त तपासण्या करून त्याप्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण, क्षारांचे प्रमाण, रक्त गट, लिव्हर व किडनीच्या घटकांचे प्रमाण याची नोंद घेण्यात येते आणि त्यानुसार औषधोपचार सुरू केला जातो. छातीचा एक्स-रे, मानेच्या, हाताच्या आर्टरीची सोनोग्राफी करण्यात येते. इको करून रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते. रक्तगट तपासून दोन ते तीन बाटल्या रक्ताची सोय करून ठेवण्यात येते. शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री रुग्णाला सहसा झोपेची गोळी देण्यात येते, जेणे करून मनावरील दडपण कमी होऊन त्याला छान झोप लागेल. रात्री दहानंतर रुग्णाचे पोट रिकामे ठेवले जाते.
सकाळी रुग्णाला शस्त्रक्रिया कक्ष ओ.टी.मध्ये नेण्यात येते. भूल दिल्यानंतर शरीरात वेगवेगळय़ा नळय़ा टाकण्यात येतात, त्यामार्फत शरीरातील रक्तदाब, फुप्फुसातील रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, लघवीचे प्रमाण यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यात येते. हे सर्व काम भूलतज्ज्ञ डॉक्टर करतात. मग मुख्य सर्जन आणि सहाय्यक सर्जन, छातीच्या मध्यभागी असणाऱ्या हाडाच्या मध्यभागी (स्टर्ननम) छेद घेऊन हृदयापर्यंत पोहचतात. वेगवेगळे ग्राफ्ट वेगवेगळय़ा रक्तवाहिन्यांवर जोडले जातात. हार्ट-लंग मशीन वापरून ओपन हार्ट सर्जरी करायची की ऑक्टोपस वापरून बिटिंग हार्ट सर्जरी करायची हा निर्णय सर्वस्वी सर्जनचा असतो. शस्त्रक्रियेनंतर स्टर्ननम या हाडास तारांनी जोडून मग चामडीवर टाके घालण्यात येतात. या शस्त्रक्रियेला सहसा चार ते सहा तास लागतात. किती ग्राफ्ट टाकतो आणि गुंतागुंत किती आहे यावर शस्त्रक्रियेचा वेळ अवलंबून असतो.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दोन ते तीन दिवस ठेवले जाते. तेथे शरीरातील वेगवेगळय़ा नळय़ांमार्फत रुग्णाच्या रक्तदाब, ईसीजी, तापमान, लघवीचे प्रमाण, ऑक्सिजनचे प्रमाण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सहा ते २४ तास बेशुद्धावस्थेत असतो आणि त्याला कृत्रिम श्वासोच्छवास म्हणजेच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येते. दुसऱ्या दिवसापासून रुग्ण पूर्णपणे शुद्धीत आल्यानंतर मग वेगवेगळय़ा नळय़ा, वेगवेगळय़ा पॅरामीटर योग्य असल्यास काढण्यास सुरुवात होते. सोबत त्याला खुर्चीत बसायला किंवा थोडीफार हालचाल करण्यास सांगण्यात येते. थोडे चालायला, थोडे फुप्फुसाचे व्यायाम, खोल श्वासांचे व्यायाम करायला रुग्णाला सांगण्यात येते. या दिवसात त्याला पातळ किंवा हलकाच आहार देण्यात येतो.
तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी रुग्णाला वॉर्डमध्ये हलवले जाते. काही गुंतागुंत वाटल्यास त्याचा अतिदक्षता कक्षाचा मुक्काम वाढतो. रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, रोगजंतूमुळे फुप्फुसाला किंवा नळय़ांमुळे लघवीला जंतुसंसर्ग होणे, मधुमेह बळावणे, अर्धागवायूचा झटका येणे हे प्रकार क्वचित घडू शकतात, पण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अतिदक्षता विभागातील वैद्यकीय आणि इतर सहाय्यक वृंदगण या सर्व गुंतागुंतीवर नजर ठेवून असतात आणि योग्य ती उपाययोजना करीत असतात. हे होण्याचे प्रमाण एक ते दोन टक्के एव्हढेच आहे. तीन-चार दिवस वार्डमध्ये राहिल्यानंतर आणि सर्व शारीरिक क्रिया स्वतंत्रपणे काही त्रासाशिवाय करू लागल्यानंतर रुग्णास रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते.
छातीच्या हाडाची जखम पूर्णपणे भरून येण्यास अंदाजे आठ आठवडे लागतात. तोपर्यंत जड वजन उचलणे, झटका बसणाऱ्या हालचाली टाळणे आवश्यक असते. दोन ते तीन महिने छातीला बांधायला एक पट्टा दिला जातो. तो वापरला की हाडाची हालचाल कमी होते. जखम भरायला आणि दुखणे कमी व्हायला मदत होते. घरीसुद्धा डॉक्टरने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे. जरुरीपुरतीच विश्रांती घ्यावी. अनावश्यक पडून राहू नये. जेवण हलकेच घ्यावे. चमचमीत पदार्थाचा अतिरेक करू नये, फळे, शक्तिवर्धक पेय यांचा जेवणात समावेश करावा. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे टाळावे. चालण्याचा आणि श्वसनाचे व्यायाम योग्य प्रमाणात करावा आणि हळूहळू त्यांचे प्रमाण वाढवावे. साधारणपणे एक महिन्यात सहसा रुग्ण आपल्या सर्व दिनचर्या पूर्वीसारख्या करू शकतो. नंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम वाढवावा.
आपल्या वयोमानाप्रमाणे आणि तब्येतीप्रमाणे व्यायाम, निवडावा.. पोहणे.. मैदानी खेळ (हलके स्वरूपाचे) रुग्ण पूर्वीच्याच उत्साहाने करू शकतो. योग.. योगासने केल्याने मानसिक ताणतणावही कमी होऊ शकतो. या दरम्यान डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जखमींची मलमपट्टी करणे, टाके काढणे या सारख्या गोष्टी सर्जनकडून करणे आवश्यक असते. रक्तदाब मोजमाप, मधुमेहाचे नियंत्रण, रक्तपातळ करण्याच्या गोळय़ा, कोलेस्टेरॉल नियंत्रण, आहाराचे.. व्यायामाचे मार्गदर्शन वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरकडून करून घेणे आवश्यक असते. सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यात आपल्या आजाराचा जास्त बाऊ न करता योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
बायपास शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे रुग्ण जीवन व्यवस्थित जगू शकतो. दीड-दोन महिन्यानंतर आपल्या कामावर, नोकरीवर जाऊ शकतो. ९०-९५ टक्के लोकांमध्ये पूर्वी होणारा त्रास, छातीत दुखणे, दम लागणे पूर्णपणे बंद होते. त्यांचे आयुष्य वाढण्यास आणि जीवनाचा दर्जा चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी बायपासमुळे मदत होते. दहा वर्षांमध्ये २०-३० टक्के लोकांमध्ये पुन्हा छातीत दुखणे, दम लागणे, अन्जायनाला सुरुवात होऊ शकते. याचा अर्थ की रक्तवाहिन्यांमध्ये किंवा ग्राफ्टमध्ये पुन्हा नवीन अडथळे तयार होतात. अशावेळी पुन्हा अॅन्जिओग्राफी करून अवरोध (अडथळा) कुठे-कुठे आहेत हे बघणे अपरिहार्य आहे आणि अशा वेळी अॅन्जिओप्लास्टी करून ते अडथळे दूर करणे जास्त सोयीस्कर आहे. पुन्हा बायपास करणे जोखमीचे काम असते.
झपाटय़ाने विकसित होणाऱ्या विज्ञानशास्त्रामुळे बायपासचा धोका कमी झाला आहे. जास्तीत जास्त आयुष्य वाढून आयुष्य चांगले आरोग्यदायी राहावे हाच औषधे, अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीचा उद्देश आहे. या तीनही गोष्टींचा योग्य ठिकाणी योग्य रुग्णासाठी वापर केल्यास खूप फायदा होतो हे सिद्ध झालेले आहे. पण औषधशास्त्रात, वैद्यकशास्त्रात कोणत्याही उपचार पद्धतीत १०० टक्के शाश्वती कोणालाही देता येत नाही. कोणीही अमरत्व घेऊन आलेला नाही. गुंतागुंत (Complication) धोके, जोखीम, मृत्यू या गोष्टींना काही रुग्णांना सामोरे जावे लागते आणि काही गोष्टींबाबत डॉक्टरसुद्धा अनभिज्ञ असतो. कोणत्या रुग्णाला कधी व केव्हा गुंतागुंत होईल हे ही सांगणे अवघड असते. जर मधुमेह असेल, किडनीचे आजार, फुप्फुसाचे आजार, हृदयाची कार्यक्षमता ३० टक्केपेक्षा कमी असेल किंवा वय जर जास्त असेल, तर बायपास शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंत होण्याचे किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले असते. अशा रुग्णामध्ये डॉक्टरांची टीम विशेष काळजी घेत असते, तरीही काही गोष्टी टाळता येत नाहीत.
काही गुंतागुंती या शरीराच्या प्रतिकार शक्तीवर किंवा अवयवाच्या हृदयाच्या सहनशक्तीवर अवलंबून असतात. वरील नमूद केलेल्या आजारामुळे शरीराची आणि अवयवांची प्रतिकारशक्ती व सहनशक्ती कमी झालेली असते, म्हणून गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. गेल्या ४०-४५ वर्षांत बायपास शस्त्रक्रियेच्या शास्त्रात खूपच सुधारणा झाल्यात. नवनवीन पद्धती, नवनवीन मशिन्स, सर्जनची आणि भूलतज्ज्ञांची कुशलता, उपलब्धता यामुळे बायपास शस्त्रक्रियांमध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच बायपास सर्जरी ही सोपी, कमी जोखमीची पण रुग्णाला आयुष्य देणारी आणि चांगले आयुष्य जगण्यास मदत करणारी शस्त्रक्रिया आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…
मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…