मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मंत्रालयात थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह युवकांचा धोरणनिर्मिती प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या.
शासनाच्या विविध योजना, अनुदाने आणि सवलतींची माहिती अधिक व्यापकपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. नवीन कायदे, शासन निर्णय किंवा शैक्षणिक धोरणांबाबत युवकांची मते जाणून घेण्यासाठी ‘ओपिनियन पोल’ किंवा डिजिटल अभिप्राय यंत्रणा विकसित करण्याची सूचनाही विद्यार्थ्यांनी केली. ‘मायगव्ह’सारख्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना सहजपणे आपली मते नोंदविता यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या सूचनांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अपेक्षा मनमोकळेपणाने व्यक्त करण्यासोबतच शासनाच्या उपक्रमांचा अभ्यास करून नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करून विद्यार्थ्यांनी दस्तऐवज किंवा माहितीपुस्तिका तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून एक तास सामाजिक कार्य करावे
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाजात जाऊन सामाजिक प्रश्नांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून किमान एक तास सामाजिक कार्यासाठी द्यावा. विद्यार्थ्यांनी ठोस सामाजिक उपक्रम हाती घेतल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि आर्थिक पाठबळ देण्याची शासनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सवलती व योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक महाविद्यालयात महिला प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली ‘नोडल कमिटी’ स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, व्हॉट्सॲप आणि इतर डिजिटल माध्यमांतून योजनांची माहिती थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाही उभारली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
CET आणि स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेवर भर
स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. राज्य सरकार आणि सीईटी सेलने परीक्षा सुरक्षेसाठी ७३ हून अधिक बिंदू निश्चित केले असून, सायबर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने मानवी हस्तक्षेप कमी करून परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय नशामुक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ्य, रस्ते सुरक्षा, एकल पालकांच्या मुलांच्या समस्या, NSS आणि NCC मधील सहभाग, शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीतील वास्तव, माहितीतील दरी आणि लोकसहभागाचे महत्त्व यावरही संवाद झाला.
विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तरे दिली. मंत्रालयातील हा संवाद विद्यार्थ्यांना शासनव्यवस्थेचे प्रत्यक्ष आकलन करून देणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…
मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…