महाराष्ट्र

दुष्काळावरून काँग्रेसचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल; अतुल लोंढेंचा सवाल

‘शेतकऱ्यांच्या ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन कुठे गेले?’

मुंबई: राज्यात गंभीर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून आहे; मात्र सरकार अद्याप अभ्यास करण्यातच व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत, मात्र केवळ दौऱ्याने प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा वाढता संताप लक्षात आल्याने मुख्यमंत्री बांधावर गेले आहेत. ही बाब चांगली असून काँग्रेस त्याचे स्वागत करते; मात्र सरकारने आता शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याची गरज आहे.

भाजपाने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना द्यावे, असे आव्हान लोंढे यांनी दिले.

‘दुष्काळातून रोजगार हमी योजना जन्माला आली’

१९७२ च्या दुष्काळातून काँग्रेस सरकारने धडा घेत रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेतून लाखो हातांना रोजगार मिळाला. पुढे केंद्र सरकारने हीच संकल्पना स्वीकारून मनरेगा कायदा केला. कोरोनाच्या काळातही मनरेगाने ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार दिला. मात्र भाजपा सरकारने मनरेगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता ही योजनाच मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला.

राज्यात यापूर्वी अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना किती मदत केली आणि प्रत्यक्ष किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा महायुती सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीही फसवी ठरल्याचा दावा त्यांनी केला.

‘दुष्काळाचा सामना करण्यासाठी ठोस योजना कुठे?’

दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारकडे कोणत्या ठोस योजना आहेत, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला. २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ४९ हजार कोटी रुपयांच्या वॉटर ग्रीडचे काय झाले, याचाही सरकारने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. शरद पवार मुख्यमंत्री असताना कमी पाण्यावर तग धरू शकणारी फलोद्यान योजना राबवण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात फूड प्रोसेसिंग क्षेत्रात मोठी क्रांती झाली, असा दावा लोंढे यांनी केला.भाजपा सरकारच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेती क्षेत्रासाठी अशा स्वरूपाचे ठोस काम झाल्याचे दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री आता शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आल्या असतील. शेतकऱ्यांचे दुःख समजले असेल तर आता काहीतरी ठोस आणि चांगले निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा पुन्हा जुन्याच पद्धतीने कारभार सुरू राहू नये, अशी अपेक्षा अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दुष्काळाच्या संकटातून बळीराजाची सुटका कर, शेतशिवार पुन्हा हिरवेगार होऊ दे; सुनेत्रा पवार

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री…

10 सेकंद ago

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जा; सुनेत्रा पवारांचे पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार…

7 मिनिटे ago

राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेला मोठी चालना; १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; एकनाथ शिंदेंक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार…

13 मिनिटे ago

विद्यापीठांत विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने; चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आयोजन; युवा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर मुंबई: १००व्या…

17 मिनिटे ago

ठाणे क्लस्टरचा ‘नवा चेहरा’; ६ हजार कुटुंबांना सुरक्षित घरे, २३ नागरी सुविधा आणि रोजगाराची संधी

ठाणे: ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास हा केवळ जुन्या घरांच्या जागी नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून, हजारो…

28 मिनिटे ago

‘डीजे’ बंदीला सादलगावात हरताळ; पोलिस निरीक्षकांनी स्वतः ध्वनिक्षेपक बंद केला

दोन गणेश मंडळांच्या कर्णकर्कश मिरवणुकीवर नागरिकांची तक्रार; पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची तातडीने कारवाई शिरूर…

38 मिनिटे ago