मुंबई: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गुरुवार, १५ जानेवारी रोजी राज्यभर मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुका ‘पॅनेल पद्धतीने’ होत असल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पद्धतीत नेमके मतदान कसे करायचे, ईव्हीएम कशी असेल, नोटा कसा वापरायचा, यासंबंधी मतदारांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे
प्रश्न : शहरातील प्रभाग रचना कशी आहे
उत्तर: शहरात प्रामुख्याने चार सदस्यांचे प्रभाग असून एकूण ४० प्रभाग आहेत. यापैकी एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे.
प्रश्न : चार किंवा पाच सदस्यांच्या प्रभागात किती उमेदवारांना मतदान करावे लागेल
उत्तर: चार किंवा पाच सदस्यांच्या प्रभागात प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मतदान करावे लागते. म्हणजेच चार सदस्यांच्या प्रभागात चार गटांमध्ये आणि पाच सदस्यांच्या प्रभागात पाच गटांमध्ये मतदान करणे बंधनकारक आहे.
प्रश्न : प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम असणार का
उत्तर: नाही. एकाच ईव्हीएमवर १६ उमेदवारांची नावे बसवता येतात.
ईव्हीएमवर प्रथम ‘अ’ गटातील उमेदवारांची नावे व चिन्हे, शेवटी त्या गटासाठी NOTA बटण असेल.
त्यानंतर एक रकाना रिकामा ठेवून ‘ब’, ‘क’, ‘ड’ (आणि ‘इ’) गटांची नावे असतील.
उमेदवारांची संख्या जास्त असल्यास दोन किंवा तीन ईव्हीएम मशिन्स वापरण्यात येतील.
प्रश्न : एखाद्या गटात मतदान करायचे नसेल तर काय करावे
उत्तर: एखाद्या गटातील कोणताही उमेदवार पसंतीचा नसेल, तर त्या गटातील NOTA (वरीलपैकी कोणीही नाही) बटण दाबावे लागेल.
प्रश्न : चार किंवा पाचपैकी कमी मतदान केल्यास काय होईल
उत्तर: प्रत्येक गटात मतदान करणे अनिवार्य आहे.
जर एखाद्या गटात मतदान केले नाही, तर मतदानाची प्रक्रिया अपूर्ण मानली जाईल आणि मत ग्राह्य धरले जाणार नाही.
प्रश्न : मतदानाची अर्धवट प्रक्रिया पूर्ण कशी केली जाईल
उत्तर: मतदान अपूर्ण राहिल्यास हे केंद्र प्रमुखांच्या त्वरित लक्षात येते.
त्या वेळी मतदान केंद्रातील राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटच्या उपस्थितीत, संबंधित गटासाठी NOTA बटण दाबून प्रक्रिया पूर्ण केली जाते.
प्रश्न : अ, ब, क, ड, इ गट कसे ओळखायचे?
उत्तर: प्रत्येक गटासाठी विशिष्ट रंग निश्चित करण्यात आला आहे
अ गट : पांढरा
ब गट : गुलाबी
क गट : पिवळा
ड गट : निळा
इ गट : हिरवा
या रंगांवरून गट सहज ओळखता येतील.
प्रश्न: ईव्हीएमवर उमेदवारांचा क्रम कसा ठरतो
उत्तर: प्रथम राष्ट्रीय व राज्य पक्षांचे उमेदवार, त्यानंतर अपक्ष उमेदवारांची नावे असतात.
उमेदवारांचा क्रम मराठी वर्णमालेनुसार आडनावाच्या क्रमाने निश्चित केला जातो.
प्रश्न : उमेदवारांची माहिती मतदारांना कशी मिळेल?
उत्तर: राजकीय पक्ष व उमेदवारांनी माहितीपत्रके वितरित केली आहेत.
तसेच, निवडणूक आयोगातर्फे मतदान केंद्राबाहेर प्रत्येक गटातील उमेदवारांची नावे व चिन्हांची यादी लावलेली असते. त्यावरून मतदार माहिती घेऊ शकतात.
मतदानाचा हक्क बजावा, लोकशाही बळकट करा
प्रत्येक पात्र नागरिकाने निर्भयपणे व पूर्ण प्रक्रियेत मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…