रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. या चिखलमय रस्त्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थी-विद्यार्थिनींना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी तातडीने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ राजेंद्र बाबासो पवार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत पवार यांनी भांबर्डे ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावाचा रस्ता तसेच जुना दहिवडी रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना या मार्गावरुन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या मार्गाचा शालेय विद्यार्थ्यांकडूनही नियमित वापर केला जातो. चिखलातून वाट काढताना विद्यार्थ्यांचे कपडे आणि शालेय साहित्य खराब होत असून घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात घडण्याचाही धोका आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याची अवस्था लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची अशी अवस्था झाल्याने पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरती डागडुजी न करता साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा करावा, रस्त्यावर दर्जेदार मुरूम टाकावा आणि तो यंत्राच्या साहाय्याने व्यवस्थित समतल व मजबूत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मंदिर परिसर असल्याने धार्मिक कार्यक्रम, दर्शन तसेच इतर कामांसाठी या मार्गावरुन ग्रामस्थांची सतत ये-जा सुरु असते. जुना दहिवडी रस्ताही शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनाने संभाव्य अपघात घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
“सदर बाब नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी रस्त्यावर तातडीने मुरूम टाकावा. रस्ता समतल, मजबूत व सुरक्षित करून ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनधारकांची ये-जा सुरळीत करावी,” अशी मागणी राजेंद्र बाबासो पवार यांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन या मागणीची किती तातडीने दखल घेते आणि प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीचे काम कधी सुरू करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे
जर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला नाही. तर येत्या दोन-तीन दिवसात त्यासाठी रस्त्याच्या खड्ड्यात पाण्यात चिखलात मध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबासाहेब पवार यांनी दिला आहे
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…