मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, केंद्रीकृत प्लेसमेंट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्यविकास उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जतेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
यामध्ये ISTE Centralized Placement Platform, Centre for Future Skills आणि ISTE-SmartBridge AI Skilling Initiative या प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे.
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची सांगड
मंत्री पाटील म्हणाले की, बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवकांना सक्षम करण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समन्वय अधिक प्रभावी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी किंवा पदविका देणे हा शिक्षणाचा अंतिम उद्देश नसून, त्यांना रोजगारक्षम आणि उद्योगसज्ज बनविणे गरजेचे आहे.
उद्योगांच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत यासाठी अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगानुभव यांची सांगड घालण्यात यावी. कौशल्यविकास उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्पष्ट, परिणामाभिमुख आणि कालबद्ध रोडमॅप तयार करून त्यानुसार ठोस निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रोजगार, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप एकाच व्यासपीठावर
बैठकीत ISTE Centralized Placement Platformच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांनुसार त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, तसेच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
AI क्षेत्रातील प्राथमिक ते प्रगत प्रशिक्षण
Centre for Future Skillsच्या माध्यमातून भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना बैठकीत मांडण्यात आली. तसेच ISTE-SmartBridge AI Skilling Initiativeच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्राथमिक ते प्रगत स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले.
‘शिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून सक्षम भविष्य’ या दिशेने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थात्मक स्वरूप देऊन त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यावर शासनाचा भर राहील, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (ICT) कुलगुरू तथा बौद्धिक संपदा समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध पंडित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, AICTEचे प्रताप देसाई तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…