महाराष्ट्र

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ब्रम्हपुरी : तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा दर्जा आणि संथगतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या कालव्याला अवघ्या वर्षभरातच अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे सिंचनाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाचा निकृष्ट दर्जा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदार तसेच सिंचन विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.

गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील ‘क्रिटिकल पॅचेस’च्या बांधकामासाठी एम.के.एस., बीआयपीएल आणि सरला या कंपन्यांना तब्बल २३५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण करण्याची मुदत संपूनही आतापर्यंत केवळ १५ टक्के कामच पूर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे काम पूर्ण झाले आहे, त्याचाही दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाल्याने या संपूर्ण कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांचा आधीच आंदोलनाचा इशारा

कालव्याच्या कामाला होत असलेला विलंब आणि पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने यापूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला आहे.

पाहणीदरम्यान आमदार विजय वडेट्टीवार यांनी कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांच्या संगनमतामुळे कामाचा दर्जा खालावल्याचा गंभीर आरोप केला. “शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याशी खेळ केला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच निकृष्ट काम केल्याचा आरोप असलेल्या एम.के.एस. कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली.

यावेळी कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांच्यासह सिंचन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेत तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.

गोसेखुर्दसारख्या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पात निकृष्ट काम, विलंब आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळालेच पाहिजे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

कालवा पाहणीवेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, उपनगराध्यक्ष डॉ. नितीन उराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, सुधीर शिउरकर, संजय राऊत, विनोद बर्ले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago