कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा
कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन वारशाने समृद्ध असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील वनसंपदेवर भाजपा महायुती सरकारने कुऱ्हाड चालवली आहे. कथित भ्रष्टाचार आणि कमिशनच्या हव्यासापोटी गुजरातच्या कंपनीसाठी सह्याद्रीचा वारसा विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. कर्जत-भीमाशंकरच्या वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात धाव घेऊ, असा आक्रमक इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकर परिसरातील जंगलात होत असलेल्या वृक्षतोडीची पाहणी सपकाळ यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
‘एक पेड माँ के नाम’चा नारा एका बाजूला, दुसरीकडे वृक्षतोड!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा वृक्षारोपणाचा संकल्प केला असताना महाराष्ट्रात मात्र मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल सुरू आहे. पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कर्जतच्या जंगलात वृक्षारोपण केले, असे सपकाळ म्हणाले.
भाजपा सरकार महाराष्ट्राची संपत्ती विकायला निघाले असून आता कमिशनसाठी निसर्गसंपत्तीही विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात उभारला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होतील आणि वृक्षतोडीच्या बदल्यात दुसरीकडे लाखो झाडे लावली जातील, अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र, ही आश्वासने प्रत्यक्षात कितपत उतरतील, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. यापूर्वी सरकारने ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता; त्या वृक्षारोपणाचे काय झाले, असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या दाव्यांवर शंका व्यक्त केली.
प्रकल्प अत्याधुनिक असल्याचे सरकार सांगत असेल, तर त्यातून हजारो रोजगार नेमके कसे निर्माण होणार, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. सरकार महाराष्ट्राची दिशाभूल करत असून चुकीचे कथानक पसरवत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.
विधान परिषद निकालाने सत्तेच्या अहंकाराचे गर्वहरण!
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील तीन जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. या निकालाने सत्तेच्या अहंकाराचे गर्वहरण झाले असून महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
निकालाची मतमोजणी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला हिणवणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. मात्र, निकाल स्पष्ट झाल्यानंतर या पोस्ट हटवाव्या लागल्याचा दावा सपकाळ यांनी केला. पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे पद असून नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे वर्तन करणे पदाला शोभत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरात, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले. नागपूरच्या निवडणुकीत फडणवीस यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती; तरीही तेथे महायुतीला धक्का बसल्याचे सांगत सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
वाढवण बंदरविरोधी आंदोलनात सपकाळ सहभागी होणार
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरविरोधी जनआंदोलनाला भेट देऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता वाढवण बंदराच्या प्रश्नावरही काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या दौऱ्यावरून स्पष्ट होत आहे.
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…
केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…
‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…
२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…