इंगळे कुटुंबासोबत भाकरी खात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या; कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
मेहकर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातील भाकरी खात त्यांच्या जगण्यातील वेदना आणि संघर्ष जाणून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा विश्वास दिला. दामोदर इंगळे आणि कमलाबाई इंगळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्यासोबत भोजन करताना शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता त्यांनी समजून घेतली. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या स्वप्नांना अडथळा येऊ देणार नाही, त्यांच्या शिक्षणासाठी शिवसेना मदतीला उभी राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह आर्थिक अडचणीमुळे रखडू नयेत, यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा, सेवा संकल्प अभियान तसेच विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाड, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जवसुलीच्या नावाखाली धमकावणाऱ्यांवर कारवाई करा
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावकार, बँका आणि मायक्रोफायनान्स संस्थांच्या कर्जवसुलीचा त्रास सहन करावा लागू नये. कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या संस्थांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश शिंदे यांनी दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये, पाच हजार रुपयांची आगाऊ मदत, कर्जवसुली स्थगिती, जमीन महसूल सवलत, कृषी पंप वीजबिलात दिलासा, परीक्षा शुल्क सवलत आणि मनरेगाच्या निकषांमध्ये शिथिलता अशा विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी महिलांना दिला. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क परतावा देण्याच्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. शिवसेनेच्या माध्यमातून ११ हजार बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया, दोन हजारांहून अधिक कॉक्लियर इम्प्लांट आणि आरोग्य उपक्रमांतून तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या तपासण्यांमुळे हजारो महिलांमधील कर्करोगाचे वेळेत निदान होऊन उपचाराची संधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण आणि शेतीला पर्याय
दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या, पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा तसेच छावण्यांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना घरपोच चारा देण्यावर सरकारचा भर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार, जलतारा उपक्रम, श्री श्री रविशंकर यांच्या टीमचे सहकार्य, जलसंधारण, क्लस्टर शेती, कमी पाण्यात येणारी पिके आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन अशा माध्यमांतून शेतीला नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नैसर्गिक आपत्तीच्या ठरावीक निकषांबाहेरील परिस्थितीतही शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्राला मदतीचा विश्वास दिल्याचे त्यांनी सांगितले.
मेहकरसाठी ९२५ कोटींचा विकास निधी
मेहकर शहरासाठी ९२५ कोटी रुपये, तर संपूर्ण मतदारसंघासाठी सुमारे पाच हजार ५०० कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यकर्ता घरात नव्हे, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, असे सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संकटग्रस्त नागरिकांसाठी मदत केंद्रे उभारून प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करू. शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रतापराव जाधवांचे सहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या सहा महिन्यांच्या मानधनाची सात लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या योगदानातून सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला.
लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशीन आणि सायकलींचे वाटप
कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना अनुदान आणि धनादेशांचे वाटप करण्यात आले.
महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप…
पर्स्लेन (पोर्टुलाका ओलेरेसिया) ही एक पानेदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते…
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…
३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण; प्राथमिक, माध्यमिकसह विविध प्रवर्गांतील शिक्षकांचा समावेश मुंबई: राज्यातील शैक्षणिक…
शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; बालाजी मोटे यांच्या गोपनीय माहितीने आरोपी जाळ्यात! शिरूर (अरुणकुमार…
शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था…