महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप
मुंबई: राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करत असताना राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दिवाळी सण आला तरी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. केवळ पाच हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. वाढत्या महागाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच हजार रुपयांत दिवाळी साजरी करून दाखवावी, असे थेट आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यास सरकार टाळाटाळ करत असून, हे सरकार केवळ मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील टिळक भवन येथे कोकण विभागातील लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सहप्रभारी यू. बी. व्यंकटेश, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी राज्य सरकारसह भाजपवरही जोरदार टीका केली. भाजपने सर्व राजकीय मर्यादा ओलांडल्या असून, महिलांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीतील रामलीला मैदानावरील काँग्रेसच्या महारॅलीदरम्यान बसमधील काँग्रेस खासदारांच्या व्हिडिओचा काही सेकंदांचा भाग सोशल मीडियावर व्हायरल करून काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे सपकाळ म्हणाले. संबंधित व्हिडिओतील दोन्ही खासदारांचे बहिण-भावाचे नाते असताना त्यांच्या नात्याबाबत संशय निर्माण करून भाजपने महिला खासदाराचाही अपमान केला आहे. या प्रकरणात कोणाकडूनही तक्रार करण्यात आलेली नसताना जाणीवपूर्वक चुकीचे कथानक पसरवले जात आहे. अशा प्रकारे फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेस योग्य त्या यंत्रणेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘गोकुळ’वर कब्जा मिळवण्याचा महायुतीचा डाव!
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गोकुळ परिवाराने त्यांना सत्तेचा कौल दिला. एका बाजूला सतेज पाटील आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण महायुती असे चित्र असतानाही सतेज पाटील यांनी महायुतीचा पराभव केला.
मात्र, गोकुळवर ताबा मिळवण्यासाठी महायुती सरकारने पाच शासनमान्य सदस्यांची नियुक्ती करण्याचा आणि त्यापैकी चौघांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संविधान आणि लोकशाहीच्या तत्त्वांना धुडकावून गोकुळवर अप्रत्यक्षपणे कब्जा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न असो, भाजपकडून कथित फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रकार असो किंवा सहकारी संस्थांमधील सत्तेचा संघर्ष असो, प्रत्येक मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची टीका करत सपकाळ यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…