कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि निर्णयक्षमतेचे जाहीरपणे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोल्हापुरात आयोजित तेली समाजाच्या मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचेही कौतुक केले.
बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयांचा आणि कामाच्या वेगाचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या निर्णयांचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विधानसभेतही त्यांच्या कामाचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी मिश्किल शैलीत वडेट्टीवार यांनी, ‘2029 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करायला सुद्धा आपण पाहिजे,’ असे वक्तव्य केले.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी सरकारमध्ये समाजाच्या मागण्या मांडाव्यात, तर आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेतून हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करू, असे त्यांनी सांगितले.
तेली समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी
तेली समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. संताजी महाराजांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात समाज भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच समाजाच्या विकासासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी समाजासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा उल्लेख करत आता त्यात आणखी वाढ करण्याची अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. ‘मागणारे आम्ही आहोत, देणारे तुम्ही आहात,’ असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांच्याकडून समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
पारंपरिक व्यवसायावरही भाष्य
तेली समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. खाद्यतेल विक्रीशी संबंधित बदलांमुळे छोट्या पारंपरिक व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याचे सांगत, गरीब ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
समाजाच्या प्रश्नांसाठी बावनकुळे यांनी आठवड्यातून किमान दोन तास द्यावेत, असे आवाहन करत वडेट्टीवार यांनी सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे समाजहिताचे प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका मांडली.
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…
कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…
शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…