दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे
ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याच्या देवीसमोर साकडे घातले. दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तसेच केंद्र सरकारकडूनही भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नवरात्रोत्सव मंडळांनी उत्सवातील काही बचत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावी, असे आवाहनही शिंदे यांनी केले. “बळीराजाची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही,” असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशे, लेझीम, टाळ-मृदंग, कोळी नृत्य, गोंधळ नृत्य, आदिवासी तारपा नृत्य आणि विविध पारंपरिक कलाप्रकारांच्या सादरीकरणातून देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर टेंभी नाका येथील मंडपात देवीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
केंद्राकडून मदतीचे आश्वासन
दुष्काळग्रस्त भागाची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली असून, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठकही पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. केंद्र सरकार महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पूर्ण करण्यात आली असून, सवलती आणि नुकसानभरपाईसोबतच संकटग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी मदतीचा हात
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या विवाहाचा प्रश्नही गंभीर आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून शिवसेनेने जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच मराठवाड्यातील २५ हजार शेतकरी कुटुंबांतील मुलींना सायकली आणि २५ हजार महिलांना शिलाई मशीन वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ परभणीतून करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
नवरात्रोत्सवातील बचत शेतकऱ्यांसाठी
दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मंडळाने यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे. इतर नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सवातील काही खर्च कमी करून दुष्काळग्रस्त बळीराजाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाचे ४८वे वर्ष
स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे यंदा ४८वे वर्ष आहे. यंदा देवभूमी उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवीच्या आगमन सोहळ्यावेळी ठाणे पोलिसांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मानवंदना देण्यात आली. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटनाप्रमुख आनंद परांजपे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस, अमित जयस्वाल तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…
कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…