मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात महावितरणचा बेजबाबदारपणा; आठ दिवस होऊनही जळालेले रोहित्र मिळेना

शिंदोडी (तेजस फडके) एकीकडे कडक उन्हामुळे शेतकरी हैराण झालेले असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ, बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभारामुळे शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शिंदोडी येथील फडके मळा परिसरात शनिवार (दि. 23 मे) रोजी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि रोहित्र कोसळून नैसर्गिक आपत्तीमुळे भुईसपाट झाले. मात्र तब्बल आठ दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला अपयश आले असून शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा अक्षरशः सुकू लागल्या आहेत. “आठ दिवस थांबा”, “साहित्य नाही”, “रोहित्र उपलब्ध नाही”, “केबल संपली”, “फ्युज नाहीत” अशी कारणांची यादी सांगत महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदार शेतकऱ्यांना फक्त ‘तारीख पे तारीख’ देत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यातली हि पहिली घटना नाही. गुनाट येथे 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या गारपिटीमध्ये विजेचे खांब पडले होते. त्यानंतर 14 मे 2026 रोजी कुऱ्हाडवाडी (निमोणे) येथे वादळी वाऱ्यामुळे रोहित्र आणि खांब कोसळले. तसेच शिंदोडी येथे दि 23 मे 2026 रोजी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या तिन्ही घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे. महावितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल ८ ते १० दिवस लागले.

ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असताना सलग आठ-आठ दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी पुर्णपणे संकटात सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करुन उभ्या केलेल्या बागा कोमेजू लागल्या असून अनेक ठिकाणी फळांची गळती सुरु झाली आहे. “पाणी नाही तर डाळिंब नाही” अशी भीषण अवस्था निर्माण झाली असताना महावितरण प्रशासन मात्र निवांत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

ठेकेदारांच्या मनमानीमुळे ग्रामीण वीजयंत्रणा वाऱ्यावर…?
महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीची बहुतांश कामे खासगी ठेकेदारांकडे दिल्यानंतर ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ठेकेदारांकडे ना पुरेसे कर्मचारी, ना आवश्यक साहित्य आणि ना तातडीने काम करण्याची तयारी. परिणामी एखादे रोहित्र जळाले किंवा खांब पडले की तेथील संपुर्ण वस्ती अंधारात आणि शेतकरी संकटात अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

शेतकरी वारंवार फोन करून थकतात; मात्र अधिकाऱ्यांकडून “उद्या पाहतो”, “साहित्य आले की काम सुरु करतो”, “खांब शिल्लक नाहीत”, “फ्युज संपले आहेत”, “माणसं उपलब्ध नाहीत” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

बिल थकल्यास तत्काळ तोडता मग शेतकऱ्यांचे काय…?
यापुर्वी बिल भरण्यास एक दिवस उशीर झाला तरी महावितरणचे कर्मचारी तत्काळ वीज तोडायला येतात. मग शेतकऱ्यांचे रोहित्र जळाल्यावर आठ-आठ दिवस महावितरणचे कर्मचारी अन अधिकारी गायब का असतात…? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा पुर्ण बोजवारा उडालेला असताना वरिष्ठ अधिकारी मात्र वातानुकुलियत कार्यालयात बसून फक्त आदेश देत असल्याची टिका नागरिकांनी केली आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शिंदोडी परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डाळिंब उत्पादक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर…
डाळिंब हे अत्यंत संवेदनशील आणि खर्चिक पीक मानले जाते. उन्हाळ्यात नियमित पाणी न मिळाल्यास झाडे सुकणे, फळांची गळती होणे आणि उत्पादन घटणे हा मोठा धोका असतो. मात्र याची पुर्ण जाणीव असतानाही महावितरण प्रशासनाकडुन कोणतीही तातडीची उपाययोजना केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

महावितरणचे स्पष्टीकरण…
याबाबत शिरुर येथील महावितरणचे अधिकारी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी कामाला उशीर होत आहे.”

(क्रमश:) 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

5 मिनिटे ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

9 मिनिटे ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

18 तास ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

18 तास ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

18 तास ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

18 तास ago