मुख्य बातम्या

घोड धरणाच्या संपादित क्षेत्रातही वाळू माफियांचा ११ ब्रास वाळूचा बेकायदेशीर साठा; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शासनाच्या मालकीच्या आणि घोड धरणासाठी संपादित केलेल्या क्षेत्रातच महसूल विभागाची परवानगी न घेता वाळूचा बेकायदेशीर साठा केला जात असेल, तर अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. चिंचणी (ता. शिरुर) येथे तब्बल ११ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा आढळून आला असून, याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचणी येथील गायरान गट क्रमांक १२८ लगत असलेल्या घोड धरणाच्या संपादित क्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला. महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वाळूचा साठा करुन ठेवल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान घटनास्थळी अंदाजे ११ ब्रास वाळू आढळली. हा प्रकार दि. २४ नोव्हेंबर २०२६ पुर्वी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गुनाट येथील ग्राम महसूल अधिकारी रुपेश दिलीप शेटे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ ब्रास वाळू आली कुठून…? मालक कोण…?

या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ११ ब्रास वाळूचा साठा करणारा नेमका कोण…? हि वाळु कोणत्या ठिकाणाहून आणली…? तिची वाहतूक कोणत्या वाहनातून झाली…? या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे…? वाळूचा साठा विक्रीसाठी केला होता का…? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल करताना आरोपीचे नावच समोर आलेले नाही. 

मात्र, वाळूचा साठा अचानक केलेला नाही. त्यासाठी वाहतूक, मनुष्यबळ आणि यंत्रणा लागते. मग या साठ्यामागील व्यक्तींचा शोध घेणे प्रशासनाला अशक्य आहे का…? की तपास केवळ पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्यापुरताच मर्यादित राहणार…?

महसूल यंत्रणेच्या नजरेतून वाळूचा साठा सुटतोच कसा…?

घोड धरणाच्या संपादित क्षेत्रात बेकायदेशीर वाळू साठवण्यापर्यंत संबंधित व्यक्तींचे धाडस वाढले असेल, तर महसूल विभागाच्या नियंत्रण आणि देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. अवैध वाळू व्यवसायाविरोधात कारवाईचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात अशा घटना घडत असतील, तर प्रतिबंधात्मक यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते, याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.

केवळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन प्रशासनाने जबाबदारी झटकू नये. वाळूचा मालक शोधून काढणे, साठ्याचा स्रोत तपासणे, वाहतुकीचा माग काढणे आणि या प्रकरणात कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

आता प्रश्न केवळ ११ ब्रास वाळूचा नाही, तर घोड धरणाच्या संपादित क्षेत्रात बेकायदेशीर वाळू साठवण्याचे धाडस करणाऱ्यांपर्यंत कायद्याचे हात पोहोचणार का…? हा आहे. अज्ञात आरोपीचा शोध लागणार की पुन्हा एकदा फक्त गुन्हा दाखल झाल्याची नोंद करुन प्रकरण थंडावणार…? याकडे शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; कर्ज पाच लाखांचे, व्याजापोटी उकळले ४ लाख २० हजार; तरीही सावकाराचा पैशांसाठी तगादा

शिरुर (तेजस फडके) गरजवंताच्या आर्थिक अडचणीचा फायदा उठवून त्याला व्याजाच्या जाळ्यात अडकवायचे, अवाच्या सव्वा व्याज…

55 मिनिटे ago

डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना नको; महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप…

19 तास ago

घोळूची भाजी म्हणजे शेतातील सोन्याची खाण

पर्स्लेन (पोर्टुलाका ओलेरेसिया) ही एक पानेदार हिरवी वनस्पती आहे जी बहुतेक वेळा तण मानली जाते…

20 तास ago

साखर आरोग्यास अपायकारक

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…

20 तास ago

राज्यातील १२३ शिक्षकांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर

३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण; प्राथमिक, माध्यमिकसह विविध प्रवर्गांतील शिक्षकांचा समावेश मुंबई: राज्यातील शैक्षणिक…

20 तास ago

दुष्काळग्रस्तांच्या मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या विवाहाची जबाबदारी शिवसेना घेणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही!

इंगळे कुटुंबासोबत भाकरी खात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या; कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मेहकर : दुष्काळग्रस्त…

20 तास ago