मुख्य बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिरूर–मलठण रस्त्याची दुरावस्था कायम; नागरिक संतप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते मलठण दरम्यानचा मुख्य मार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आजही खड्डेमय अवस्थेत असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोंढण ओढ्याच्या जवळ रस्ता अतिशय खराब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.अनेक वेळा डागडुजी करण्यात आली, निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची परिस्थिती “जैसे थे”च राहिली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण दुपटीने वाढते. काही ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून गेले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. अपुऱ्या प्रकाशामुळे खड्डे न दिसल्याने अनेक अपघात घडले असून काहींना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत.

या मार्गावरून दररोज शेकडो शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यापारी वर्ग ये-जा करतो. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी हाच प्रमुख मार्ग असल्याने खराब रस्त्याचा थेट परिणाम आर्थिक हालचालींवर होत आहे. वाहनांची दुरुस्ती, इंधनाचा वाढलेला खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिरूर उपविभागाकडून दरवर्षी तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. काही दिवसांतच नव्याने टाकलेले डांबर उखडते, खडी बाहेर पडते आणि पुन्हा खड्डे तयार होतात. “काम फक्त कागदावर होते, प्रत्यक्षात मात्र टिकाऊ काम दिसत नाही,” अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली.

स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी बहुधा पुणे येथे मुक्कामी असतो. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी, कामाची गुणवत्ता तपासणी आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अधिकारी वेळोवेळी भेट देत नसल्याने कंत्राटदारांवर देखरेख राहत नाही, परिणामी निकृष्ट कामे सुरूच राहतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. “रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करून दर्जेदार डांबरीकरण झाले पाहिजे. फक्त खड्डे बुजवून प्रश्न सुटणार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अपघातांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.

तालुक्यातील इतर काही रस्त्यांची स्थिती सुधारली असताना शिरूर–मलठण मार्ग मात्र कायम दुर्लक्षित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रशासनाने तातडीने संपूर्ण रस्त्याची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करावे, पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी आणि काम पूर्ण होईपर्यंत नियमित देखरेख करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एकीकडे विकासाच्या गप्पा रंगत असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हलगर्जीपणा झटकून ठोस आणि टिकाऊ उपाययोजना केल्यासच शिरूर–मलठण मार्गावरील नागरिकांना दिलासा मिळेल, अन्यथा हा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत राहणार, हे निश्चित.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

12 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

17 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago