मुख्य बातम्या

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा व मोटारसायकल जप्त

शिरू (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहीत्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने महावितरण आणि शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास अडथळे निर्माण होत होते. अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरत होते, तर महावितरणला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत शिरूर पोलिस ठाण्याच्या डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करून दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून तब्बल १८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या ३०० किलो तांब्याच्या तारा आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे शिरूर तालुक्यासह परिसरातील डीपी चोरीच्या मालिकेलाच मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घटनेची सुरुवात १ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत आण्णापुर (ता. शिरूर) येथील येवलेमाथा परिसरात झाली होती. दत्तात्रय कापरे व शेख मुलाणी यांच्या शेतातील विद्युत रोहीत्र फोडून त्यामधील सुमारे १५० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी गणेश राजेंद्र दिघे (रा. प्रीतमप्रकाश नगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२६ अन्वये भारतीय विद्युत कायदा कलम १३६ व भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शरद वारे यांच्याकडे सोपविण्यात आला.

दरम्यान, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत होती. या घटनांमुळे अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीत होत होता. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प होत होते, उद्योगधंदे अडचणीत येत होते आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या गुन्ह्यांचा गांभीर्याने विचार करून डीबी पथकाला विशेष सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास मोहीम सुरू करण्यात आली.

तपासादरम्यान गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. याच दरम्यान पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, डीपी चोरी करणारे संशयित संतोष बारकु भालेराव व किरण गोविंद खंडांगळे (दोघेही रा. जळुके बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) हे शिरूर येथील हुडको कॉलनी परिसरात येणार आहेत.

माहितीची खातरजमा करून डीबी पथकाने तात्काळ सापळा रचला. अत्यंत शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच अखेर आण्णापुर येथील डीपी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिस कोठडीत अधिक चौकशी केली असता आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह टाकळी हाजी बेट परिसरात आणखी १८ ठिकाणी डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरी केल्याची धक्कादायक कबुली दिली.

या कबुलीजबाबानंतर शिरूर पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा क्रमांक ०५, ३३, ४१, ५४, ११५, ११६, १२७, १४६, १४७, १७३, १८३, २४९, २५१, २९१, ३५०, ४००, ५९८ आणि ६१८/२०२६ या एकूण १८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

आरोपींकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ३०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, ज्यांची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये आहे, त्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली एक मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यामागील इतर साथीदार, चोरीचा मुद्देमाल विक्रीचे रॅकेट आणि इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार शरद वारे, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, वैभव शेलार, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील डीपी चोरीच्या वाढत्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून शेतकरी आणि ग्रामस्थांनी शिरूर पोलिसांच्या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago