मुख्य बातम्या

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी…?

 

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातुन दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असतानाही संबंधित प्रशासनाच्या कारवाईचा पत्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. धरण परिसरातील वाळू अक्षरशः ओरबाडली जात असताना अधिकारी आणि यंत्रणा नेमकी कोणाची वाट पाहत आहेत…? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे एक महिन्यापुर्वी घोड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीच वाळू उपसा करणाऱ्यांची नावासह यादी तयार करुन शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले आहे. मग एवढी स्पष्ट माहिती पोलिसांच्या हाती असताना कारवाईचे घोडे नेमके कुठे अडकले आहे…? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

घोड धरण हे शिरुर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जलसाठ्याचे साधन आहे. मात्र, याच धरणातून गेल्या पाच वर्षांपासुन बेसुमार आणि बेकायदा वाळू उपसा होत आहे. हा केवळ वाळू चोरीचा विषय राहात नाही. धरणाची सुरक्षितता, पर्यावरणाचा समतोल आणि शासनाच्या करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे.

घोड धरणात सर्रास दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्याइतपत धाडस वाळु माफियांमध्ये कशाच्या बळावर येते..? त्यांना प्रशासनाच्या कारवाईची भीती राहिलेली नाही का…? वाळू उपसा करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त आहे का…? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पाटबंधारे विभागाला वाळू उपसा करणारे माहीत आहेत, त्यांची नावासह यादीही पोलिसांकडे आहे, तर मग कारवाई कोण थांबवत आहे…? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेला देणे आवश्यक आहे.

एकीकडे शासनाकडून अवैध वाळू उपशाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले जातात. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र धरणातून वाळू उपसा सुरुच असल्याचे चित्र असेल, तर आदेश आणि अंमलबजावणी यांच्यातील दरी स्पष्ट होते. एकीकडे कागदावर कारवाई आणि प्रत्यक्षात मोकळे रान, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का…? असा सवालही उपस्थित होत आहे.

पाटबंधारे विभागाने तक्रार दिली असेल तर त्या तक्रारीवर शिरुर पोलिसांनी काय केले…? संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले का…? गुन्हा दाखल केला का…? वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री किंवा वाहने जप्त केली का…? धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली का…? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस प्रशासनाने स्पष्टपणे देण्याची गरज आहे.

महिनाभरापूर्वी तक्रार…नावासह यादी… तरीही वाळू उपसा सुरुच…

मग प्रश्न साधा आहे. शिरुर पोलिस कारवाईसाठी नेमका कोणता मुहूर्त शोधत आहेत…? घोड धरणाची संपत्ती दिवसाढवळ्या लुटली जात असल्याचे आरोप होत असताना प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाण्यात उतरुन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच वाळू उपसा करणाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे. 

घोड धरणातील वाळू उपशाचा हा प्रकार तातडीने थांबवून संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करावी, तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या तक्रारीवर नेमकी काय कारवाई झाली याचा खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घोड धरण वाळू माफियांच्या ताब्यात आहे की प्रशासनाच्या…? या प्रश्नाचे उत्तर शिरूर तालुक्यातील नागरिकांना अपेक्षित आहे. 

याबाबत शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की, घोड पाटबंधारे विभागाने पत्र दिल्याची मला काही कल्पना नाही. याबाबत मी अधिक माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. 

(क्रमश:)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

3 दिवस ago