शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर झाल आहे. अशा काळात काही लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना हातात सापडल्यानंतर त्याचा मोह आवरणे अनेकांसाठी कठीण असते. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मनात कोणताही लोभ न ठेवता इस्त्रीच्या कपड्यात सापडलेला अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण त्याच्या मुळ मालकाला परत करणाऱ्या इनामगाव (ता.शिरुर) येथील वनिता व गोकुळ दळवी या पती-पत्नीने प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे गावासह संपुर्ण पंचक्रोशीतुन कौतुक होत असून, त्यांच्या प्रामाणिकतेला ग्रामस्थांकडून मनापासून सलाम केला जात आहे.
हातात इस्त्रीला आलेल्या कपड्यांचा गठ्ठा होता…त्यामध्ये अचानक सोन्याचा गंठण सापडला…क्षणभर नजर त्या दागिन्यावर गेली; पण मनात लोभाचा विचार आला नाही. कारण तो दागिना आपला नव्हता, एवढीच भावना मनात होती. समोर तीन-चार लाख रुपयांचे सोने असतानाही त्याला हात न लावता प्रामाणिकपणे मुळ मालकाच्या स्वाधीन करणाऱ्या इनामगावच्या वनिता आणि गोकुळ दळवी या पती-पत्नीने आजच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.
वनिता आणि गोकुळ दळवी यांचा इनामगाव येथे लॉन्ड्रीचा छोटासा व्यवसाय आहे. गुंठाभरही शेती नाही. आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. कुटुंब लॉन्ड्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालत. रोजच्या कष्टातून संसाराचा गाडा पुढे नेणाऱ्या या दांपत्यासमोर अचानक अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण आला. किंमतही काही हजारांची नव्हे, तर तब्बल तीन ते चार लाख रुपयांच्या आसपास! मात्र, दळवी दाम्पत्याने त्या सोन्याकडे संधी म्हणून पाहिलेच नाही.
सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला दिले महत्त्व…
दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी लॉन्ड्रीमध्ये काम करत असताना एका ग्राहकाच्या कपड्यांमध्ये अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण आढळून आला. दागिना सापडताच दळवी दांपत्याने तो लपवून ठेवण्याऐवजी तत्काळ विजय मोकाशी, प्रदीप पवार आणि गोविंद नलगे यांना याबाबत माहिती दिली. हा विषय इथेच थांबला नाही. दागिना कोणाचा आहे, याचा शोध घेण्यात आला. अखेर हा गंठण सागर काळे यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर दळवी दांपत्याने सोन्याचा गंठण काळे यांच्या स्वाधीन केला. लाखोंचे सोने हातात असतानाही “हे जर आपण ठेऊन घेतले तर कोणाला कळणार आहे…?” असा विचार न करता “हे आपले नाही” एवढा साधा विचार मनात ठेवून दागिना परत करणाऱ्या दळवी दांपत्याच्या प्रामाणिकपणामुळे संपुर्ण गावासह शिरुर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परिस्थिती बेताची; पण मन मात्र श्रीमंत…
आजच्या काळात पैशासाठी नातेसंबंधही बदलताना दिसतात. अशा परिस्थितीत एखाद्याचा लाखो रुपयांचा दागिना सापडूनही तो परत करण्याची भूमिका घेणे निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे दळवी दाम्पत्याकडे गुंठाभरही शेती नाही. लॉन्ड्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा संसार चालतो. रोजच्या कष्टाची जाणीव असतानाही त्यांनी दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवला नाही. यामुळेच या घटनेत सोन्याच्या गंठणाची किंमत तीन-चार लाख रुपये असली, तरी दळवी दांपत्याच्या प्रामाणिकपणाची किंमत मात्र त्यापेक्षाही कितीतरी मोठी आहे.
“असे प्रामाणिक लोक गावाची शान असतात.”
दळवी दांपत्याने सोन्याचा गंठण परत केल्याची माहिती इनामगावमध्ये पसरताच त्यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा सुरु झाली. ग्रामस्थांनी त्यांच्या या कृतीचे मनापासून कौतुक केले. त्यामुळे इनामगाव ग्रामस्थ, चंदू काका सराफ अँड कंपनी, दौंडचे सोनकशेठ शहा आणि सरपंच अनुराधा घाडगे यांनी वनिता व गोकुळ दळवी या पती-पत्नीचा सन्मान करुन त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
आज गरज आहे ती अशाच माणुसकीची…
सोन्याचा गंठण परत करण्याची घटना वरकरणी साधी वाटू शकते; मात्र त्यामागे प्रामाणिकपणा, संस्कार आणि दुसऱ्याच्या हक्काचा आदर दडलेला आहे. आर्थिक परिस्थिती माणसाला अनेकदा मोहाच्या वाटेवर घेऊन जाते. पण दळवी दांपत्याने परिस्थितीपेक्षा संस्कार मोठे असल्याचे सिद्ध केले.
सोनं सापडलं, पण मन मात्र सोन्यासारखं निघालं…
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या काळात काही लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना सापडूनही त्याचा थोडाही मोह न बाळगता तो मुळ मालकाला परत करण्याची दळवी दांपत्याची कृती समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. स्वतःची परिस्थिती बेताची असली तरी संस्कार आणि प्रामाणिकपणाची श्रीमंती मोठी असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही अडीच तोळ्यांचा गंठण सापडल्यानंतर मनात कोणताही मोह न धरता तो प्रामाणिकपणे परत करणाऱ्या वनिता आणि गोकुळ दळवी या दांपत्याने इनामगावच्या नाव लौकिकाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…