आरोग्य

पायांवर सूज येण्याची कारणे व उपचार

अनेकांना दिवसभरात खूप वेळ उभे राहून काम करावे लागते, अशांचे संध्याकाळी पाय सुजलेले दिसतात; पण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती सूज नाहीशी झालेली आढळते. अशी सूज असल्यास विशेष काळजी करायचे कारण नसते; पण पायांबरोबर शरीरावर इतरत्र देखील सूज येते, तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक चिकित्सा करावी लागते. तिचे काही प्रकार असतात.

१) पेरीफेरल इडिमा: यामध्ये तळपाय, घोटे, मांडीपासून खालचा संपूर्ण पाय या भागांवर तसेच तळात, दंड, प्रामुख्याने कोपरामधील हात यावर येणारी सूज असत.

२) मेंदूच्या आवरणांवर त्याचप्रमाणे मेंदूवर येणारी सूज

३) डोळ्यांच्या बाहेरील भागात आणि अंतस्थ दृष्टिपटलावर येणारी सूज.

पायांवर सूज येण्याची कारणे: पायामध्ये रक्ताभिसरण करणार्‍या असंख्य केशवाहिन्या असतात. त्यामधून वाहणार्‍या रक्तातील द्रवभाग हा काही कारणांमुळे केशवाहिन्यांमधून बाहेर पडतो. तो केशवाहिन्यांच्या बाहेर असलेल्या मांसल आणि मेदयुक्त भागातल्या पेशींमध्ये पसरतो. या क्रियेनंतर त्या भागातला रक्तपुरवठा वाढतो आणि अधिक द्रवपदार्थ या भागात पसरतो. हा भाग बाह्यत्वचेच्या अगदी खाली असतो. त्यामुळे तो फुगलेला किंवा सुजलेला दिसतो. त्यावर अंगठ्याने दाब दिल्यास खड्डा पडतो.

पायांवर सूज येण्याची कारणे

निष्क्रियता: अजिबात हालचाल न करता, शारीरिक व्यायाम टाळून दिवसभर बैठे काम करणार्‍या लोकांत अशी सूज हमखास आढळते. दीर्घकाळ उभे राहणे – कामानिमित्त एका जागेवर दीर्घकाळ उभे रहाव्या लागणार्‍या व्यक्तींच्या पायांवर अशी सूज येते. प्रवासानिमित्त बसमधून, मोटारमधून किंवा विमानातून खूप लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकांना हा अनुभव येतो.

शस्त्रक्रिया: पायांच्या हाडांवर, स्नायूंवर, सांध्यांवर शस्त्रक्रिया झाल्यास काही काळ सूज येत राहते, ती नंतर उपचारांनी आणि व्यायामांनी आटोक्यात आणता येते. उष्ण हवामान – खूप तप्त वातावरणात शारीरिक श्रमाचे काम केल्यास, खूप चालल्यास किंवा डोंगर चढल्यास पायांच्या घोट्यांवर सूज येते.

स्त्रियांची संप्रेरके: अनेक स्त्रियांमध्ये गर्भावस्थेत शेवटच्या तीन महिन्यात पायांवर सूज येते. तसेच काही स्त्रियांना पाळी येण्यापूर्वी किंवा पाळीदरम्यान पायांवर सूज येते. संतती नियमनासाठी नियमित गोळ्या घेणार्‍या स्त्रियांच्या पायांवर सूज येऊ शकते, तसेच पाळी गेल्यानंतर रजोनिवृत्तीच्या काळातसुद्धा संप्रेरकांच्या उतार-चढावामुळे अनेक स्त्रियांना पायावर सूज येते.

औषधे

उच्च रक्तदाबाची काही औषधे, हाडांच्या किंवा सांध्यांच्या विकारात वापरली जाणारी औषधे, वेदनाशामके, मधुमेहाची काही औषधे, कर्करोगातील केमोथेरपी, मूत्रप्रवृत्ती वाढवणार्‍या औषधांचा अतिरेक यामुळे पायांवर आणि शरीरावर सूज येते. मीठ – आहारात मिठाचा अतिरेकी वापर करणार्‍या व्यक्तींमध्ये सूज येते. जीवनसत्वे आणि प्रथिने – शरीरात ‘ब’ जीवनसत्वाचे तसेच प्रथिनांमधील अल्ब्युमिनचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी असेल, हिमोग्लोबिन खूपच कमी असेल, तर पायांवरच नाही तर सार्‍या शरीरावर सूज येते.

गंभीर आजार: उच्च रतदाब, हृदयाचे कार्य कमी पडणे, मूत्रपिंडे निकामी होऊ लागणे, मधुमेह अशा महत्त्वाच्या आजारांमध्ये शरीरावर सूज येते. यकृताचे कार्य बिघडल्यामुळे होणार्‍या लिव्हर सिरहोसिसमध्ये पोटात पाणी होऊन सर्व शरीर सुजते आणि साहजिकच हातपायसुद्धा सुजतात. थायरॉइडमध्ये संपूर्ण शरीरावर आणि पायांवर सूज येते. मात्र थायरॉइडमुळे येणार्‍या या सुजेमध्ये पायांवर अंगठा दाबल्यास खड्डा पडत नाही. संधिवातामध्ये तसेच पायाच्या सांध्यांच्या, गुडघ्याच्या विकारात एका किंवा दोन्ही पायांवर सूज येऊ शकते. विशेष कारणे पायांच्या रक्तवाहिनीत गुठळी झाल्यास त्यापुढील रक्तपुरवठा बंद होऊन पायांवर सूज येते.

व्हेरिकोज व्हेन्स: आपण उभे राहिलेलो असताना, पायांच्या रक्तवाहिन्यातले रक्त गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर चढवण्यासाठी त्यात काही व्हॉल्व्हज असतात. ते निकामी झाल्यास पायांच्या रक्तवाहिनीत रक्त जमा राहून ते वर चढत नाही. परिणामतः त्यातील द्राव बाहेर पडून पायांवर सूज येत राहते.

जंतुसंसर्ग

पायामधील मांसल किंवा मेदयुक्त भागात किंवा पायातील रसग्रंथींना जंतूसंसर्ग झाल्यास, मोठे गळू झाल्यास पायांवर सूज येते. इजा – पायाला किंवा पायांच्या हाडांना मार बसल्यास, हाड मोडल्यास किंवा पाय भाजल्यास सूज येते. पायातील पेशींमध्ये एखादी गाठ, सिस्ट, ट्युमर असल्यास किंवा पायांच्या रसवाहिन्यांना सूज आल्यास पाय सुजतात.

लक्षणे

पायांवर सूज आल्यावर पायाची त्वचा लाल होते, ती ताणली जाते आणि तिच्यात एकप्रकारची रोगट चमक दिसते. पायांच्या सांध्यांची विशेषतः घोट्याची आणि पायांच्या बोटांची हालचाल नीट होत नाही, त्यामध्ये वेदना होतात. सूज आलेल्या भागावर बोटांनी दहा सेकंद दाब दिल्यास खड्डा पडतो. नाडीची गती आणि रक्तदाब वाढलेले असतात. यकृताचा आजार असल्यास पोट फुगलेले असते आणि त्यात पाणी झालेले असते.

निदान

पायांवर सूज येणार्‍या रुग्णांचे निदान करताना त्याचा वैद्यकीय इतिहास, रुग्णाची एकंदरीत शारीरिक अवस्था, सूज आल्याचा कालावधी, सूज सतत असते का काही ठराविक वेळ असते? आणि यापूर्वी अशीच सूज येऊन गेली आहे का? या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते. विशेष वैद्यकीय तपासण्यांमध्ये हिमोग्लोबिन, रक्तपेशी, मधुमेह, मूत्रपिंडे, यकृत यांच्या आजारांबाबत रक्ताच्या आणि लघवीच्या सामान्य आणि विशेष तपासण्या केल्या जातात. छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी, कार्डिओग्राम आणि प्रसंगी सिटीस्कॅन, एमआरआय देखील करावे लागतात. कर्करोगाची शक्यता असल्यास त्या भागातील पेशींचा तुकडा काढून तो तपासण्याची तजवीज करणे गरजेचे असते.

उपचार

सर्वसामान्य उपचारात पेशींमध्ये जमा झालेला द्राव मूत्रावाटे बाहेर पडण्यासाठी सुरुवातीला डाययुरेटिक्स दिली जातात; पण एकूण आजाराचे निदान करून त्या त्याप्रमाणे उपचार करणे आवश्यक समजले जाते. पायांवर सूज येणार्‍या रुग्णांनी आहारातील मीठ कमी करणे, नियमित व्यायाम करणे, एका जागेवर दीर्घकाळ न बसता ठराविक वेळेनंतर थोडा फेरफटका मारणे, वजन कमी करणे या गोष्टी प्रकर्षाने कराव्यात. लांब पल्ल्याच्या प्रवासात आपले आसन सोडून थोडे पाय ठराविक काळाने मोकळे करत राहावे. झोपताना पायाकडील भाग थोडा उंच करून झोपावे.

व्हेरिकोज व्हेन्सचा विकार असलेल्या रुग्णांनी सतत स्टॉकिंग्ज वापरल्यास उत्तम. पायांना मसाज केल्यास थोडा उपयोग नक्की होतो. रुग्णांनी तीव्र उन्हात काम करू नये तसेच खूप उष्ण पाण्याने आंघोळ करणे टाळावे. सूज हे एक महत्त्वाचे लक्षण असून, त्याकडे लक्ष न दिल्यास त्यामागील आजार बळावत तर जातोच; पण ती सूज वाढल्यास त्वचेला भेगा पडून तिथे जखमा होतात. त्यात जंतूसंसर्ग होऊ शकतो, तिथला रक्तप्रवाह बंद होऊन पाय धोक्यातदेखील येऊ शकतात. जरी त्या जखमा बर्‍या झाल्या तरी त्या ठिकाणी त्वचा बेढब करणारे व्रण निर्माण होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाळूमामा देवस्थानात 60.75 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल, तरी आरोपी फरार!

आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…

31 मिनिटे ago

पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’

‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…

35 मिनिटे ago

ब्लड कॅन्सरचे प्रकार व त्यावरील उपचार

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…

42 मिनिटे ago

रक्तदान करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या…

एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे…

49 मिनिटे ago

तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त आहात का चला तर मग हे काही घरगुती उपाय करा

दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये…

52 मिनिटे ago

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

12 तास ago