महाराष्ट्र

भुसावळमध्ये मतदार यादीतून १४,५६२ नावे वगळण्याचा डाव? १८६ जणांच्या नावाने एकाच दिवशी हरकती दाखल!

SIR प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ यांची FIR आणि स्वतंत्र चौकशीची मागणी

मुंबई: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तब्बल १४ हजार ५६२ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी केवळ १८६ व्यक्तींच्या नावाने, एकाच दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर २०२६ रोजी Form-7 द्वारे हरकती दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तातडीने FIR दाखल करून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्देशांद्वारे एका व्यक्तीला दावे व हरकतींच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त १० Form-7 अर्ज दाखल करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींसाठी लागू आहे. मात्र, या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसांत भुसावळमध्ये हजारो मतदारांविरोधात हरकती दाखल झाल्याने संशय निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, ज्या १८६ व्यक्तींच्या नावाने अर्ज दाखल करण्यात आले, त्यापैकी काहींनी हे अर्ज आपण केलेच नसल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे. केवळ तीन व्यक्तींच्या नावाने तब्बल ४६३ हरकती दाखल असल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले आहे. काही अर्जदारांनी Form-7 बाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

या अर्जांमध्ये अनेक संशयास्पद बाबी आढळल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. एकाच व्यक्तीच्या नावाने १२ ते २० वेगवेगळ्या यादी भागांतील मतदारांविरोधात शेकडो हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. अर्जदार ग्रामीण भागातील असताना त्यांच्या नावाने अन्य भागांतील मतदारांविरोधात हरकती दाखल झाल्या आहेत. अनेक अर्जांमध्ये प्रत्येक भागात नेमक्या २० किंवा २५ हरकतींचे एकसारखे गठ्ठे आढळले आहेत. काही अर्जांवर तीन ते चार वेगवेगळी हस्ताक्षरे आणि वेगवेगळ्या शाईचा वापर झाल्याचेही उपलब्ध प्रतींवरून दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक मतदारांना ‘Absent’ म्हणजे अनुपस्थित असल्याचे कारण देऊन हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित मतदार प्रत्यक्षात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर राहत असून, SIR प्रक्रियेदरम्यान घरोघरी पडताळणी झाल्यानंतरच त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप

या संपूर्ण प्रकारात निवडणूक आयोगाचे निर्देश, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, फौजदारी कायदा आणि भारतीय संविधानातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘लाल बाबू हुसेन विरुद्ध मतदार नोंदणी अधिकारी’ या १९९५ मधील निकालाचा संदर्भ देत, मतदार यादीत आधीपासून नाव असलेल्या व्यक्तीला नोटीस आणि म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय तसेच ठोस पुराव्याशिवाय त्याचे नाव वगळता येत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम १३-अ, १३-सीसी आणि ३२ चा संदर्भ देत या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. फौजदारी कारवाई प्रभावीपणे होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आवश्यक निर्देश आणि अधिकृत तक्रार होणे गरजेचे असल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.

जळगावबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी

या प्रकरणाची चौकशी जळगाव जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत कालमर्यादेत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. हे अर्ज कोणी आणले, कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने स्वीकारले, त्यांची आवक नोंद व पोचपावत्या उपलब्ध आहेत का आणि आयोगाने निश्चित केलेली मर्यादा असतानाही हे अर्ज स्वीकारले कसे, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, बाधित १४ हजार ५६२ मतदारांची नावे कोणत्याही बनावट हरकतीच्या आधारे वगळली जाऊ नयेत, त्यांना तातडीने दिलासा द्यावा आणि या कथित गैरप्रकारामागील सूत्रधारांसह जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मतदार यादीची शुद्धता आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. बनावट हरकतींच्या माध्यमातून एकाही पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार हिरावला जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा, असे सपकाळ यांनी पत्रात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

24 मिनिटे ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

27 मिनिटे ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

36 मिनिटे ago

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद,…

47 मिनिटे ago

दुष्काळात पशुधनाला चाऱ्याचा आधार! ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

50 मिनिटे ago

वोटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला घुमजाव करावे लागले

राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील…

54 मिनिटे ago