महाराष्ट्र

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी… गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद, नूतन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा

मुंबई : सहजसुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी आपल्या सात दशकांच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला. ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवात आयोजित विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीचा संघर्ष, दिग्गज सहकलाकारांसोबतचे अनुभव, चित्रीकरणादरम्यान घडलेले विनोदी प्रसंग आणि अभिनयाविषयीचा दृष्टिकोन मनमोकळेपणाने मांडला. त्यांच्या आठवणींमधून हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा अनुभव रसिकांना घेता आला.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात सुरू आहे.

या महोत्सवात मंगळवारी ‘क्वीन ऑफ द कॉमेडी… गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी शुभा खोटे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सात दशकांच्या अभिनय प्रवासातील विविध टप्पे, सहकलाकारांसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध आणि पडद्यामागील अनुभव यावेळी उलगडले. या संवादाला विविध पिढ्यांतील सिनेरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

पहिल्याच चित्रपटाच्या वेळी अपघात; कारकीर्दीबाबत वाटली होती भीती!

आपल्या चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या प्रवासाविषयी बोलताना शुभा खोटे यांनी पहिल्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या अपघाताचा किस्सा सांगितला. सायकलवरून जात असताना झालेल्या अपघातामुळे आपला पहिलाच चित्रपट शेवटचा ठरणार की काय, अशी भीती वाटली होती, अशी आठवण त्यांनी मिश्किल शैलीत सांगितली. वडिलांना खेळाची विशेष आवड असल्याने त्यांनी आपल्याला कधीही खेळांपासून रोखले नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे निरीक्षण, त्यांच्याकडून मिळालेले संस्कार आणि शिकवण यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भूमिका साकारण्यापूर्वी व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास!

कोणतीही भूमिका स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव, पार्श्वभूमी आणि तिच्यातील बारकावे समजून घेण्यावर आपला भर असतो. भूमिकेचा सखोल अभ्यास करूनच तिला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करते, असे शुभा खोटे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अभिनेते मेहमूद यांच्यासोबत काम करतानाचे अनुभवही सांगितले.

अभिनेत्री नूतन यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणी सांगताना दोघींचे एकमेकींच्या घरी जाणे-राहणे, तसेच नूतन यांच्या उत्तम पाककौशल्याचे किस्से त्यांनी उपस्थितांसोबत शेअर केले. या आठवणींमधून चित्रपटसृष्टीतील कलाकारांमधील मैत्रीचे जिव्हाळ्याचे संबंधही उलगडले.

दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अपूर्णच!

आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची आजही खंत वाटते, अशी भावना शुभा खोटे यांनी व्यक्त केली.

एकूणच, अभिनयातील अनुभव, जुन्या आठवणी, सहकलाकारांशी असलेले ऋणानुबंध आणि चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील किस्से यांमुळे ‘चित्रपताका’ महोत्सवातील ही विशेष मुलाखत रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. शुभा खोटे यांच्या मनमोकळ्या संवादातून एका समृद्ध अभिनय प्रवासाचा वेध घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

50 मिनिटे ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

53 मिनिटे ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

1 तास ago

दुष्काळात पशुधनाला चाऱ्याचा आधार! ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

1 तास ago

वोटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला घुमजाव करावे लागले

राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील…

1 तास ago

मराठी सिनेमाची ५०० कोटींच्या व्यवसायाची क्षमता; ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करा

प्रवीण तरडे यांचा ‘चित्रपताका’तील परिसंवादात विश्वास; मराठी चित्रपटांच्या मार्केटिंग, निर्मिती आणि प्रेक्षकांशी तुटलेल्या नात्यावर मंथन…

1 तास ago