पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष समानतेचा आणि संविधानाचा आहे. हा काँग्रेसचा विचार आहे. तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा आणि राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हातात असावी, असा विचार भाजप आणि आरएसएसचा आहे. हा फॅसिस्ट विचार देशासाठी आणि जगासाठी अत्यंत घातक असून, देशाला या विचारापासून वाचवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असा जोरदार हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पणजी येथे ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने ‘संविधान बचाव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिनो, माजी केंद्रीय मंत्री इदुराद्रो फालेरो, माजी खासदार रमाकांत खलप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम, अजिंक्य देसाई तसेच कौमी तंजीमचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. हाजी झाकीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने देशाची वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मागील ७५ वर्षांपासून देशाची वाटचाल सुरू आहे. मात्र, संविधानाला अभिप्रेत असलेला भारत भाजप आणि आरएसएसला नको आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘स्त्री-पुरुष समानता नको, मनुस्मृतीवर देश चालवण्याचा विचार’
भाजप आणि संघाच्या विचारसरणीवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, त्यांना स्त्री-पुरुष समानता नको आहे. स्पृश्य-अस्पृश्यता मानणारा आणि मनुस्मृतीच्या विचारांवर देश चालवण्याचा त्यांचा विचार आहे. याच्या अगदी उलट काँग्रेसचा विचार आहे. संघाचा विचार देशाला तारणारा नसून, या विचारापासून देशाला वाचवण्याची गरज आहे.
आरएसएसला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात काढण्यात आलेल्या रॅलीचाही त्यांनी उल्लेख केला. संघाच्या नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होणे हा त्यांच्या वैचारिक पराभवाचा दाखला असल्याची टीका सपकाळ यांनी केली. तसेच, आरएसएसने अद्याप नोंदणी केलेली नसल्याचा दावा करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची नोंदणी करून संविधान स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘संविधान आणि काँग्रेसचा विचार एकाच नाण्याच्या दोन बाजू’
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, संविधान आणि काँग्रेसचा विचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस संविधानाच्या विचाराने वाटचाल करत आहे. भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्मांना समान अधिकार दिले असून, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे आणि यापुढेही करत राहील.
भाजप संविधान संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप करत, त्याविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाच्या रक्षणासाठी लढत असून, कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलू दिले जाणार नाही, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘संविधानाला आरएसएसचा सुरुवातीपासूनच विरोध’
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. राहुल गांधी संविधान वाचवण्याची लढाई लढत असून, हातात संविधानाची प्रत घेऊन देशभर अभियान राबवत असल्याचे ते म्हणाले.
संविधान बदलाची भाषा २०१४ पासून सुरू झालेली नसून, संविधान निर्मितीपासूनच आरएसएसने त्याला विरोध केला असल्याचा दावा चोडणकर यांनी केला. आधीचा जनसंघ आणि आताचा भाजप हे त्यांच्या राजकीय विचारांचे पक्ष संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या विचारसरणीच्या लोकांनी अनेकदा संविधान जाळले असून, आता संविधानाची पायमल्ली करत राज्यकारभार केला जात असल्याची टीका चोडणकर यांनी केली. तसेच, आरएसएसने भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यालाही विरोध केला होता आणि स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला गेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…
रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…
मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर…