अणे: माळशेज घाट मार्गाने प्रवास हा एक वेगळाच अनुभव असतो. कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातून स्वतःच्या वाहनाने अप्रतिम निसर्गसौदर्याची अनुभूती घेत होणारा प्रवास फारच आनंददायी असतो. स्वतःचे वाहन असले की हवं त्या हाॅटेलला थांबून चटकदार पदार्थांचा आस्वाद घेत, फोटोसेशन करत करत प्रवासाचा आनंद द्विगुणित होत असतो. परंतु हाच प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने करताना कंटाळवाणा आणि कमालीचा त्रासदायक वाटतो. एसटी बसेसची दूरावस्था आणि घाटात बंद पडणाऱ्या बसेस, खड्डयाखुड्डयांचे रस्ते, मोठ्या प्रमाणात सुरू असलेली रस्त्यांची कामे ही काही कारणे आहेतच. परंतु; एसटी प्रवास नकोसा वाटण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे एसटी महामंडळाने चहा नाष्टा आणि जेवणासाठी निश्चित केलेली दर्जाहीन हाॅटेल होय. ही हाॅटेल निश्चित करताना एसटी महामंडळाने नक्की कोणते निकष लावले असावेत हा संशोधनाचा विषय आहे, ‘प्रवाशांची आणि एसटी कर्मचाऱ्यांची सर्वार्थाने गैरसोय झाली पाहिजे’ हाच एकमेव निकष होता की काय अशी शंका येते.
सरळगाव ते मोरोशी दरम्यान चहा – नाष्टा आणि जेवणासाठी एसटी बसेस थांबणाऱ्या हाॅटेलांबद्दल प्रवाशांमध्ये कमालीची चीड आणि नाराजी असलेली पहायला मिळते. गावाकडे जनावरांचे गोठे सुद्धा अतिशय स्वच्छ आणि टापटीप असलेले पहायला मिळतात इतकी येथील शौचालयं गलिच्छ आणि उग्र दर्प सुटलेली असतात. सर्वसाधारणपणे हाॅटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या या शौचालयांमध्ये नाक दाबूनच जावे लागते. याठिकाणी महिलांची एवढी गैरसोय होत आहे की अनेक माता भगिनी शौचालयात न जाता तशाच मागे फिरतात आणि अवघडल्यासारख्या जीव मुठीत धरून गाडीत बसतात. रात्रीच्या वेळी एकटी दुकटी महिला या शोचालयांकडे जाणे टाळतेच. आरोग्याच्या दृष्टीने ही शौचालये कितपत योग्य आहेत याची तपासणी होणे गरजेचे आहे.
येथील खाण्यापिण्याच्या पदार्थांबाबतही प्रवाशांचे मत फारसे समाधानकारक नाही. एकाच वेळी चार पाच एसटी बस उभ्या राहिल्या तर सर्व्हिसचा पूर्णपणे बोजवारा उडालेला मी अनेकदा पाहिला आहे. हाॅटेलच्या बाहेर सर्वत्र धुळीचे साम्राज्य असल्याने एखादी बस आली तर सर्व धूळ हाॅटेलमध्ये आणि प्रवासी खात असलेल्या पदार्थांवरच बसणार ही साधीसरळ गोष्ट आहे. आता पावसाळ्यात याच धुळीचा एवढा चिखल होईल की गाडी उभी राहिल्यावर खाली उतरताना नक्की कुठे पाय ठेवू असा प्रश्न प्रवाशांना पडेल. कदाचित या ठिकाणी ड्रायव्हर कंडक्टरला व्हीआयपी सुविधा मिळत असतील अशी शंका आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही, परंतु; असे मात्र अजिबात नाही, नोकरीमुळे ते बिचारे काही बोलू शकत नाहीत. एवढं सगळं असूनही ड्रायव्हर कंडक्टर अशा हाॅटेलमध्येच का थांबतात जिथे एकही खासगी वाहन थांबत नाही याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता खालील विश्वसनीय माहिती मिळाली.
एसटी महामंडळाचा हाॅटेल मालकाबरोबर पाच वर्षांचा करार होऊन काही लाख रुपये अनामत रक्कम (डिपाॅजीट) मालकाला महामंडळाकडे जमा करावी लागते. करार झाल्यानंतर हाॅटेल निश्चित होते आणि डेपोतून ड्रायव्हर कंडक्टरला एक स्लीप दिली जाते ज्यामुळे त्यांना चहा-नाष्टा, जेवण मोफत मिळतेच, पण प्रत्येक फेरीमागे १२०/- रूपये हाॅटेल मालक कंडक्टरकडे जमा करतो. हे १२०/- रूपये कंडक्टरला डेपोत जमा करणे बंधनकारक असते, अन्यथा त्याच्या पगारातून १२०/- रूपये कापले जातात असे काही ड्रायव्हर कंडक्टरशी बोलल्यानंतर समजले. एकदा करार झाला की करार करणारे अधिकारी हाॅटेलकडे परत फिरकतही नाहीत आणि प्रवासी किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांशी हाॅटेल मालकालाही काही सोयरसुतक राहात नाही. ही सर्व हाॅटेल अशा ठिकाणी आहेत की यांच्या आजूबाजूला इतर काहीही पर्याय उपलब्ध नाही.
याबाबत अनेक ड्रायव्हर कंडक्टर यांची सुद्धा प्रचंड नाराजी आहे पण प्रवासात काहीतरी खाल्लं तर पाहिजेच ना! एकदा वरील एका हाॅटेलमध्ये मी काऊंटरच्या बाजूला उभा असताना एका कंडक्टरला स्वतःची प्लेट घेऊन किचनमधून राईस घेऊन येताना विचारले असता, ‘वीस मिनिटे झाली राईस मागतोय, शेवटी मीच जाऊन घेतला’ असं तो म्हणाला. या हाॅटेलमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक अशी आहे तर तुमची आमची काय परिस्थिती असणार. एसटी महामंडळाने कोणाशी करार करावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना पुरेशा आणि पायाभूत सुविधा मिळाव्यात एवढी माफक अपेक्षा प्रत्येक प्रवाशाला अपेक्षित आहे. पाणीसुद्धा पिण्याची इच्छा होणार नाही अशा निकृष्ट दर्जाच्या हाॅटेलांचे करार तातडीने रद्द करून एसटी महामंडळाने आता अनेक नवीन हाॅटेल या महामार्गावर झाली आहेत त्यांच्याशी नव्याने करार करावेत. अनेक महिलांच्या तक्रारीनंतर हा लेखनप्रपंच करत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांनंतरही चार सहा तासांच्या प्रवासात महिलांना एखादे चांगले शौचालयही आपण देऊ शकत नसू तर ही खूप लाजीरवाणी आणि खेदाची गोष्ट आहे.
यासाठी सर्वांनीच आवाज उठवणे गरजेचे आहे. माळशेज घाटात अनेक सुधारणा करत असलेले मुरबाड तालुक्याचे आमदार मा. किसन कथोरेसाहेब तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार मा. शरददादा सोनवणेसाहेब यांनीही प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लवकरच ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र डुंबरेसाहेब, ग्राहक पंचायतीचे मा. बाळासाहेब औटी, अभिव्यक्तीचे रविंद्र पोखरकर, पत्रकार प्रशांत बढे, पत्रकार नारायण जाधव, सेवक रविंद्र औटी आणि मी स्वतः सध्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना भेटून निवेदन देणार असून या सर्व हाॅटेलना भेट देऊन पाहणी करण्यासाठी विनंती करणार आहोत.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…