मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता MMRDAच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केला आहे. १४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकाल आणि गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता असून, या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करून परीक्षा रद्द करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय शिंदे म्हणाले की, MMRDAने २३५ जागांसाठी घेतलेल्या परीक्षेत २०० पैकी १९० पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादीचा अभ्यास केला असता काही बाबी संशयास्पद असल्याचे दिसून येते. गुणवत्ता यादीतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक तसेच सातवा, आठवा, नववा, दहावा, अकरावा आणि चौदावा-पंधरावा क्रमांकाचे उमेदवारही एकाच केंद्रावरील असल्याचा दावा त्यांनी केला.
याच उमेदवारांच्या इतर अभियांत्रिकी भरती परीक्षांतील कामगिरीचा दाखला देत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. संबंधित परीक्षांमध्ये काही उमेदवारांना १०० पैकी ७.५, १० किंवा १५ गुण मिळाले असताना MMRDAच्या परीक्षेत त्यांना तब्बल १९७ ते १९८ गुण मिळाल्याचा दावा त्यांनी केला. BMCच्या अभियांत्रिकी परीक्षेत १९७-१९८ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना केवळ १० ते १५ गुण मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, गुणवत्ता यादीतील चार टॉपर्सच्या वडिलांपैकी काही जण नगरविकास विभागात वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्याचा आरोपही धनंजय शिंदे यांनी केला. या सर्व बाबींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत निकालाला स्थगिती देऊन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात अशा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी MMRDAला जाब विचारला जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा MMRDAचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि MMRDAचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी या परीक्षेतील कथित गैरप्रकाराबाबत खुलासा करावा, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली. संजय मुखर्जी यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते MMRDAच्या महानगर आयुक्तपदी कायम कसे आहेत, याचाही खुलासा सरकारने करावा, असे त्यांनी म्हटले.
रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…