ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा
मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही आणि संविधान संपवण्याचे पाप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपाचे मुख्यमंत्री ज्ञानेशकुमार यांच्या बचावासाठी पुढे येत असल्याचे सांगत पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
‘खरा मेंदू भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच चोरीला गेला’
नाना पटोले म्हणाले, “राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकार पुराव्यासह समोर आणले आहेत. निवडणूक आयोगातून भाजपाला फायदा होईल, अशा पद्धतीने काम सुरू आहे. हा कारभार उघड झाला तर भाजपाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे भाजपाचे मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री ज्ञानेशकुमार यांचा बचाव करत आहेत.”
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या व्यक्तीने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची भूमिका बजावली पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकारांवर पांघरूण घालत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ज्ञानेशकुमार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदार नोंदणी अर्जातील बदलांवर आक्षेप
मतदार नोंदणीच्या अर्ज-६ मध्ये ज्ञानेशकुमार यांनी मनमानी पद्धतीने बदल केल्याचा दावा पटोले यांनी केला. लाखो तरुण तसेच विविध जाती-धर्मातील नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळण्याचे काम ठरवून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३२ लाख मतांची कपात करण्यात आल्याचा दावा करताना, त्यापैकी २७ लाख प्रकरणांची सुनावणी झाल्याचे सांगितले जाते; मात्र इतर दोन निवडणूक आयुक्तांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितल्याचा दावा पटोले यांनी केला. “ही सुनावणी कोणाला विचारून घेण्यात आली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ज्ञानेशकुमार यांच्या निर्णयपद्धतीवर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचा दावा करत पटोले म्हणाले की, यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात शिवसेना आणि मनसेकडून मोर्चे काढले जात असल्याबाबत विचारले असता पटोले म्हणाले की, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष किंवा संघटना लढत आहेत, त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे.
“मतचोरी आणि निवडणूक फिक्सिंगच्या विरोधात देशातील जनतेने लढा पुकारला आहे. ही तर सुरुवात आहे. लढाई मोठी असून ती सुरूच राहणार आहे. ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवण्यासाठी जे लढत आहेत, त्यांच्या सोबत काँग्रेस पक्ष आहे,” असे पटोले यांनी स्पष्ट केले.
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…