शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या घटनांमुळे बदलत चालली आहे. मागील सहा महिन्यांत तालुक्यात गोळीबाराच्या पाच घटना घडल्या. या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर एका घटनेत गोळीबार होऊनही तरुण बचावला. याच काळात रांजणगाव गणपती येथील गंभीर मारहाणीच्या घटनेतही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे किरकोळ वाद, जुने वैमनस्य आणि टोळीयुद्ध आता थेट रक्तपातापर्यंत पोहोचत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.
क्रिकेटच्या वादापासून सुरु झाली गोळीबाराची मालिका…
दि. २९ मार्च २०२६ रोजी शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेटच्या वादातून गोळीबार झाला. काही वर्षांपुर्वीपर्यंत तरुणांच्या भांडणात शिवीगाळ, हाणामारी किंवा दगडफेक होत असे; आता मात्र वाद मिटविण्यासाठी थेट बंदुकीचा वापर होऊ लागल्याने परिस्थिती किती गंभीर झाली आहे, याचा अंदाज या घटनेतून येतो. त्यानंतर दि १ जून २०२६ करडे घाट टोळीयुद्धातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. रस्त्यावर अडवून केलेल्या हल्ल्याने तालुक्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाडस किती वाढले आहे, हा प्रश्न उपस्थित झाला.
परत दि १८ जुलै २०२६ करडे येथे जुन्या वादातून पुन्हा गोळीबार झाला. एका तरुणावर दोन राऊंड झाडण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. जीव वाचविण्यासाठी संबंधित तरुणाने तलावात उडी घेतल्याने तो बचावला. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले. दि १८ सप्टेंबर २०२६ रोजी शिरुर शहरात किरकोळ आर्थिक वादातून दिवसाढवळ्या गोळीबार झाला आणि एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. म्हणजेच आता शिरुर तालुक्यात एखादा वाद झाला की त्याचा शेवट चर्चेत, मध्यस्थीत किंवा मारामारीत न होता थेट गोळीबारात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिरुरनंतर रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत गोळीबाराची घटना
रांजणगाव गणपती येथे दि १८ सप्टेंबर २०२६ वामन वाईन्स परिसरात पुर्वीच्या भांडणातून झालेल्या गंभीर मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गोळीबार नसला तरी हिंसाचाराची तीव्रता दाखविणारी हि घटना तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी वातावरणाकडे बोट दाखवते. त्यानंतर दि २९ सप्टेंबर २०२६
कारेगाव येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘कट्टा-पिस्तूल’ आता गुन्हेगारांच्या खिशातून थेट तरुणांच्या हातात…
या घटनांमधील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अवैध शस्त्रांची उपलब्धता, गावठी कट्टा किंवा पिस्तूल मिळविणे एवढे सोपे झाले आहे की क्षुल्लक वाद मिटविण्यासाठीही काही तरुण बंदूक घेऊन फिरु लागले आहेत. त्याहून गंभीर प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुलांपर्यंत ही शस्त्रे सहज पोहोचत असतील तर ती कोण पुरवत आहे…? शस्त्र विकणारा, पुरवठा करणारा आणि त्यामागील साखळी शोधल्याशिवाय केवळ गोळीबार करणाऱ्याला पकडून प्रश्न सुटणार नाही.
औद्योगिकीकरण वाढले पण पोलिस पडताळणीची यंत्रणा किती सक्षम…?
रांजणगाव एमआयडीसीसह औद्योगिक पट्ट्याच्या विस्तारामुळे शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. विविध भागांतून कामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे तालुक्याचे सामाजिक चित्र बदलले आहे. बाहेरुन येणारा प्रत्येक नागरिक गुन्हेगार आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे; मात्र भाडेकरु, कामगार आणि संशयास्पद व्यक्तींची पोलिस पडताळणी किती प्रभावीपणे होते, हा मोठा यक्षप्रश्न आहे.
शस्त्र जप्त होते; पण शस्त्र पुरवणारा मात्र बाहेरच…
एखाद्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस तपास सुरु होतो, आरोपी पकडले जातात आणि गुन्हा दाखल होतो. पण त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अनेकदा मागे पडतो. तो म्हणजे गोळी झाडणाऱ्याच्या हातात पिस्तूल आले कुठून…? या शस्त्राचा पुरवठा करणारा कोण…? शस्त्र तयार करणारा किंवा विकणारा कोण…? त्यामागे स्थानिक टोळी आहे का…? बाहेरील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आहेत का…? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहे.
‘दोन दिवसांत जामीन’च्या चर्चेने कायद्याचा धाक कमी होतोय…?
शिरुर तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना काही प्रकरणांत लवकर जामीन मिळत असल्याची दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात काही टोळ्यांकडून अल्पवयीन मुलांचा भांडणात किंवा हाणामारीत जाणीवपुर्वक वापर केला जात आहे. तसेच अनेकवेळा अल्पवयीन मुलांच्या हातात शाळेतल्या पुस्तकाऐवजी कोयता, तलवार अन गावठी कट्ट्यासारखे अवैध शस्त्र दिसत आहे.
पुढची गोळी सुटण्याची वाट पाहणार का…?
सहा महिन्यांत पाच गोळीबाराच्या घटना आणि त्यात तीन मृत्यू हि आकडेवारी दुर्लक्षित करण्यासारखी नाही. आज क्रिकेटच्या वादातून गोळीबार होतो, उद्या टोळीयुद्धातून, तर परवा किरकोळ आर्थिक वादातून एखाद्याचा जीव जातो. वादाचे कारण छोटे; पण परिणाम मात्र मृत्यू. आता पोलिसांसमोर केवळ आरोपी पकडण्याचे आव्हान नाही. तर शिरुर तालुक्यातील अवैध शस्त्रांची संपुर्ण साखळी उखडून काढण्याचे आव्हान आहे. गावठी कट्टा आणि पिस्तूल सहज उपलब्ध होत असतील, तर प्रश्न केवळ गुन्हेगारांचा नाही; प्रश्न आहे या शस्त्रांना बाजारपेठ कोण उपलब्ध करुन देत आहे याचा. शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आता आश्वासन नको तर अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याचे ठोस परिणाम दिसायला हवेत. कारण पुढची गोळी कोणावर चालेल, हे सांगता येणार नाही. पण ती सुटण्याआधी प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे.
Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…
Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…
शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…
शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….
शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…