अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सर्व आमदारांची विशेष बैठक घ्यावी, दलितवस्ती निधी आणि SIR मोहिमेवरही प्रश्न
पुणे: पुणे विभागीय कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र जिल्हा निर्देशक (डिस्ट्रिक्ट इंडिकेटर) आराखडा तयार करण्याची मागणी केली. यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना सादर केले.
ठाणेच्या धर्तीवर स्वतंत्र आराखड्याची सूचना
निवेदनात ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर पुण्यासाठी स्वतंत्र निर्देशक आराखडा तयार करून प्रगती मापन अहवाल नियमित सादर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन, मोजता येण्याजोगे आणि पारदर्शक नियोजन आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
रस्ते सुरक्षा ते मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पापर्यंत महत्त्वाचे मुद्दे
पुणे जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांची कमतरता, मेट्रो विस्तार, रस्ते सुरक्षेचे प्रश्न, आरोग्य यंत्रणेची बळकटीकरणाची गरज तसेच मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी विशेष निधी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
SDG साठी ३% निधीचा तपशील जाहीर करावा
जिल्हा नियोजनमधून SDG अंतर्गत खर्च होणाऱ्या ३ टक्के निधीचा नेमका वापर कोणत्या योजना आणि घटकांसाठी करण्यात आला, याचे सविस्तर सादरीकरण करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. निधीच्या वापरात पारदर्शकता आणि परिणामकारकता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष बैठक घेण्याची मागणी
पुणे जिल्ह्यात SDG २०३० प्रभावीपणे राबविण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांची मुंबईत विशेष बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.
दलितवस्ती सुधारणा निधी अखर्चित; SIR मोहिमेची कार्यपद्धती जाहीर करा
बैठकीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी दलितवस्ती सुधारणा निधी अखर्चित राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला. महसूल विभागाने सर्व निर्णयांची सविस्तर माहिती सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विशेष गहन पुनरीक्षण (SIR) मोहीम आणि जातिनिहाय जनगणना कोणत्या पद्धतीने राबविण्यात येणार, याची स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
महिला सक्षमीकरणासाठी अधिक तरतुदीची गरज
महिला सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्याची गरज अधोरेखित करत केंद्र सरकारच्या ‘सखी’ (वन स्टॉप सेंटर) योजनेंतर्गत सुरू असलेल्या केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवंगत अजितदादा पवारांना श्रद्धांजली
बैठक सुरू होण्यापूर्वी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत अधिकाऱ्यांच्या सादरीकरणावर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे, असे सांगितले. त्यांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजनमधून तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या अचानक निधनाने तीव्र दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…