‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले
मुंबई: समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे गरजेचे असून, ‘दिशा’ अभियानाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. या अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विशेष मुलांना योग्य शिक्षण, संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी असून, या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
३६ जिल्ह्यांतील ४५० हून अधिक शाळांचा सहभाग
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ गुणांच्या आधारे न करता त्यांच्या आत्मविश्वासावर आणि समाजात समरस होण्याच्या क्षमतेवर होणे आवश्यक आहे. सर्व शाळांमध्ये ‘दिशा’ अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ४५० हून अधिक शाळा, २७०० हून अधिक शिक्षक आणि २१ हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षमता असलेले विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत.
वैज्ञानिक आणि आधुनिक अध्यापन तंत्राच्या आधारे विशेष मुलांना शिक्षण देण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीही या अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्व विशेष शिक्षकांचा जिल्हानिहाय सन्मान
कार्यक्रमात पाच विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत समारंभपूर्वक सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
‘दिशा’ अभियान शासनाच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा उपक्रम असून, त्याच्या प्रगतीचा आणि अडचणींचा ‘वॉर रूम’मधून नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक विशेष मुलापर्यंत आणि त्याच्या कुटुंबापर्यंत दिशा अभियानाची उपयुक्त छापील वर्कबुक्स पोहोचविण्यात येणार आहेत.
तसेच नियमित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणात या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आणि जय वकील फाउंडेशन संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत. बालकांमधील विशेष गरजांची वेळीच ओळख व्हावी यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जय वकील फाउंडेशनला केले.
पाच विशेष शिक्षकांचा गौरव
‘दिशा अभियान’ प्रभावीपणे राबविल्याबद्दल यामिनी काळे (नवजीवन मतीमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (पांडुरंग निवास मतीमंद विद्यालय, लातूर), वैशाली गायकवाड (नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर), ज्ञानेश्वर काळे (कै. रावसाहेब निवासी मतीमंद विद्यालय, देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम (जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई शहर) या पाच विशेष शिक्षकांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य शासन, सामाजिक संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या एकत्रित सहभागातून विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे काम उभे राहिले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्र दिव्यांग शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. जय वकील फाउंडेशन, बजाज फिनसर्व्ह आणि एचटी पारेख फाउंडेशन यांच्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…
पुणे: हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या…