महाराष्ट्र

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने संयुक्तपणे सोडवावा, अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. नागरिकांना घरे आणि रेल्वेला विकासासाठी जागा मिळेल, अशा पद्धतीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा शुभारंभ गुरुवारी शिंदे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला.

‘कोकणवासीयांची मनं जोडणारी जीवनवाहिनी’

कोकण आणि मुंबईचे नाते पिढ्यान् पिढ्यांचे आहे. कोकणी माणसाची जन्मभूमी कोकण आणि कर्मभूमी मुंबई आहे. या जन्मभूमी आणि कर्मभूमीला जोडणारी मुंबई-सावंतवाडी रेल्वे ही कोकणवासीयांची मनं जोडणारी जीवनवाहिनी आहे. ही सेवा हजारो कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि कोकणाशी असलेल्या अतूट नात्याला नवा वेग देईल, असे शिंदे म्हणाले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रेल्वे सेवेचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. गणरायाची आरती, गावकीतील आपुलकी आणि गावच्या मातीचा सुगंध यामुळे कोकणी माणूस मनाने आधीच गावाला पोहोचलेला असतो. त्यामुळे कोकणचा प्रवास हा केवळ अंतराचा नसून आपल्या मुळांकडे जाणारा भावूक आणि भक्तिमय प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे कौतुक

कोकणची भौगोलिक परिस्थिती कठीण असतानाही कोकण रेल्वेच्या ७०१.७ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल शिंदे यांनी अश्विनी वैष्णव यांचे कौतुक केले. विद्युतीकरणामुळे प्रदूषणमुक्त प्रवासाबरोबरच रेल्वेगाड्यांच्या वेगातही वाढ झाली आहे. कोकण मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने पर्यटन आणि विकासाला नवी चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पूल हा भारताच्या अभियांत्रिकी सामर्थ्याचा अभिमान आहे. काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे अशक्य वाटणारे स्वप्न साकार करून इतिहास घडवण्यात आला आहे. देशातील १३०० हून अधिक रेल्वे स्थानकांना अत्याधुनिक सुविधा देण्याचे कामही सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.

कनेक्टिव्हिटीमुळे कोकणच्या पर्यटनाला चालना

कनेक्टिव्हिटी वाढली की रोजगार, व्यापार आणि पर्यटन वाढते आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते. मुंबई-सावंतवाडी थेट रेल्वेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाला मोठा फायदा होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

कोकणातील निसर्गरम्य डोंगररांगा, किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे तसेच आंबा-काजूच्या बागांमुळे पर्यटनाची मोठी क्षमता आहे. सुलभ रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटन मंत्री आणि नितेश राणे यांचे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली १० वंदे भारत गाड्या धावत असून बुलेट ट्रेनचे कामही वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील रेल्वे आणि पायाभूत सुविधांसाठी केंद्राने २३ हजार ९२६ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. अश्विनी वैष्णव हे सकारात्मक आणि प्रॅक्टिकल मंत्री असून काम कसे होईल याचा मार्ग ते शोधतात, असेही शिंदे यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यविकास मंत्री नीलेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

57 मिनिटे ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

58 मिनिटे ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

1 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

1 तास ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

3 तास ago

हिंजवडीच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; ४२६ कोटींच्या विकास आराखड्याला गती

पुणे: हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या…

3 तास ago