महाराष्ट्र

पुणेकरांच्या आवडत्या बर्गर किंगसह सयाजी हॉटेल आणि झेप्टोवर FDA ची कारवाई; अन्न परवाने निलंबित

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणांसह ऑनलाईन किराणा वितरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुणे कॅम्पमधील प्रसिद्ध बर्गर किंग, लोणावळ्यातील हॉटेल सयाजी आणि लोहेगाव येथील झेप्टो केंद्राचे अन्न परवाने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खाद्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बर्गर किंगमध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष

पुणे कॅम्पमधील बर्गर किंगच्या तपासणीदरम्यान कीटकांचा प्रादुर्भाव, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांनुसार आवश्यक स्वच्छतेच्या निकषांकडे दुर्लक्ष झाल्याचे FDAच्या तपासणीत आढळले. प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीला संबंधित फर्मकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने 13 ऑगस्ट 2026 रोजी अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

हॉटेल सयाजीमध्ये मुदत संपलेले खाद्यपदार्थ

लोणावळ्यातील हॉटेल सयाजी अर्थात एम/एस फॉर्च्यून एंटरप्रायझेस येथे तपासणी करताना मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. याशिवाय अन्नसुरक्षेच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे 12 ऑगस्ट 2026 रोजी हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

झेप्टो केंद्रातही गंभीर त्रुटी

लोहेगाव येथील झेप्टोच्या केंद्रावरही FDAने कारवाई केली. तपासणीदरम्यान शीतगृहाचे तापमान योग्य नसणे, मुदत संपलेली उत्पादने साठवून ठेवणे आणि FIFO (First In, First Out) पद्धतीचे पालन न करणे अशा त्रुटी आढळल्या. याशिवाय अस्वच्छता आणि कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अभावही निदर्शनास आला. या कारणांमुळे 13 ऑगस्ट 2026 रोजी संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

मोठ्या ब्रँड्सना FDAचा दणका

प्रसिद्ध खाद्य ब्रँड आणि ऑनलाईन किराणा वितरण केंद्रांवर झालेल्या या कारवाईमुळे ग्राहकांच्या आरोग्य आणि अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मोठ्या ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास असला, तरी अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवणुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.

FDAच्या या कारवाईमुळे इतर खाद्य आस्थापनांनाही अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात प्रशासनाकडून पुढील काळातही कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

20 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

22 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago