महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास, जलव्यवस्थापन आणि हवामान कृतीशी संबंधित विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. राज्यातील अशा सर्व प्रकल्पांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले प्रिन्स रहीम आगा खान यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील फेअरमाँट हॉटेल येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

या भेटीत सामाजिक विकास प्रकल्प, आरोग्य सुविधा, हवामान कृती, जलव्यवस्थापन, सांस्कृतिक वारसा संवर्धन तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी व सचिव डॉ. राजेश गवांदे आदी उपस्थित होते.

जलसंधारण, पर्यावरण संवर्धनाच्या कामाचे कौतुक

ग्रामीण महाराष्ट्रात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. जलटंचाईग्रस्त भागांमध्ये राबविण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे गावांमध्ये झालेला सकारात्मक बदल उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पांचा विस्तार अधिक मोठ्या क्षेत्रात करण्यासाठी राज्य शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकार-आगा खान नेटवर्कमध्ये संस्थात्मक समन्वय

राज्य शासन आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यात सातत्यपूर्ण संवादासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या माध्यमातून विविध प्रकल्पांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा विस्तार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील उष्णता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणपूरक नियोजन आणि हवामान कृतीसाठीचे उपक्रम महाराष्ट्रातील शहरांसाठी उपयुक्त ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बालरुग्णालय, जेरियाट्रिक रुग्णालयाच्या प्रस्तावावर चर्चा

बैठकीत प्रस्तावित बालरुग्णालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जेरियाट्रिक रुग्णालय, पुनर्वसन केंद्र, कौशल्याधारित आरोग्य सेवा प्रशिक्षण आणि संशोधन सुविधांबाबतही चर्चा झाली.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने जेरियाट्रिक तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. वाढत्या ज्येष्ठ लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता विशेष आरोग्य सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पासंदर्भातील आवश्यक माहिती शासन स्तरावर तत्काळ संकलित करून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वारसा संवर्धनासह नव्या क्षेत्रांत सहकार्याची तयारी

सांस्कृतिक वारसा संवर्धन, ऐतिहासिक स्थळांचे जतन, हरित उपक्रम आणि समुदाय सहभागावर आधारित प्रकल्पांवरही बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात अशा उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

प्रिन्स रहीम आगा खान यांनी महाराष्ट्रातील विविध विकास उपक्रमांमध्ये सहकार्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. राज्य शासनासोबतच्या भागीदारीतून आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास आणि सामाजिक विकास क्षेत्रातील प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या हितासाठी नव्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाच्या वतीने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राजशिष्टाचार, थेट परकीय गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क या विभागामार्फत आवश्यक समन्वय करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago