मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा झालेला गौरव आणि मुंबईत शिवसैनिकांनी केलेला जल्लोष, यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाभोवतीचा राजकीय उत्साह पुन्हा अधोरेखित झाला.
लंडन दौऱ्यात मिळालेले तिन्ही पुरस्कार हा केवळ आपला वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचा गौरव असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लंडनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी समाजाने केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने आपण भारावून गेल्याचे शिंदे म्हणाले. समुद्रापलीकडे राहूनही मराठी माणूस आपली भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेले नाते जपतो, याचा अनुभव या दौऱ्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका
लंडनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका आणि राज्यातील विकासाची क्षमता जगासमोर मांडता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लंडनमधील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक शिस्त तसेच हेरिटेज वास्तूंचा अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतो, असेही शिंदे म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्याची संधी मिळाल्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
परदेशातही मराठी बाणा कायम
महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या सन्मानाचा उल्लेख करताना शिंदे यांनी परदेशातील मराठी समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करून दिली. पारंपरिक मराठी वेशभूषेत झालेले स्वागत आणि मराठी भाषेचा झालेला जागर हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांची भेट झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी करूनही त्यांचा साधेपणा आणि नम्रता भावल्याचे त्यांनी नमूद केले.
लंडनमध्येही मिळाला वडापाव!
परदेशात महाराष्ट्राची ओळख आणि संस्कृती जपण्याचा अनुभव सांगताना शिंदे यांनी लंडनमधील एक मिश्कील आठवणही सांगितली. “महाराष्ट्राची संस्कृती आपण विसरू शकतो का? जगाच्या पातळीवर कुठेही गेलात तरी वडापाव मिळतो,” असे म्हणत त्यांनी लंडनमध्येही वडापाव खाल्ल्याचे सांगितले.
त्यामुळे लंडनच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपासून ते मराठी वडापावापर्यंत महाराष्ट्राची नाळ कायम जोडलेली असल्याचा संदेश शिंदे यांच्या वक्तव्यातून मिळाला.यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार तुकाराम काते, आमदार मुरजी पटेल तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…